लग्न पहावे (न) करून
ऑफिस मध्ये त्या दिवशी ठीक वाटत नव्हते म्हणून दवाख्यान्यात चेक अप करायला गेले. नेहमीप्रमाणे गर्दी भरपूर होती. (हे क्लिनिक एकतर इतके छोटे असतात, ५ लोक आली तरी क्लिनिक भरून जातं, म्हणजे बाकी लोकांना वाटायला किती वर्दळ असते इथे..) १-२ तास थांबल्यानंतर माझा नंबर आला. आत गेल्यावर हि टेस्ट ती टेस्ट करून झाली, रिपोर्ट येउपर्यंत थांबावे लागणार होते. मग मी तिथेच बसले जरावेळ. तर डॉक्टर ची असिस्टंट एकदम जवळ येत (रक्त घेताना बहुतेक रक्त कमी आणि केस जास्त बघत होती वाटतं) “काय गं तुझे केस पांढरे झाले?” मी “हो! मग?” ती “इतक्या लवकर कसे?” “वय किती?” मी जरा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिले, ती “लग्न झालाय का?” मी “नाही” ती “कसं गं तुम्हा पोरींचं, एवढ्या लहान वयात केस पांढरे? त्यात लग्न पण नाही झालं, कठीण आहे. कोण लग्न करणार?” आणि तोंड वाकडा करून निघून गेली.....आणि मी आवाक होऊन... हिला काय करायचं माझा लग्न होऊ नाहीतर नाही होऊ. फुकटचे सल्ले...
कारणं काही असो सिंगल मुलगी दिसली कि असलं काहीतरी कानावर पडतच, समोरून नसेल तर आपल्यामागे बोलतातच. पण सध्या मुलीना असं काही फरक पडत नाही. लग्नानंतर च्या जबाबदाऱ्या, कराव्या लागणाऱ्या अड्जस्टमेंट, आजूबाजूला लग्न झालेली लोकं आणि त्यांचे प्रोब्लेम्स, त्यांची घर-ऑफिस दगदग,मुलांचं संगोपन, आजारपण, अफेअर्स या सगळ्यात न अडकता हवं तसं पाहिजे तसं राहण्याच्या स्वातंत्र्यासाठी बऱ्याच मुली आहेत ज्यांनी जाणूनबुजून सिंगल राहायचा विचार केलाय. तसं एकटं राहण्याचा विचार बऱ्याच जणांच्या(मुलगा असो वा मुलगी) डोक्यात येतो, त्यात लग्न न झालेले, लग्न झालेले, सध्या रिलेशनशिप्स मध्ये असणारे आणि खूप सारे रिलेशनशिप्स करून झालेले पण असतात. तर एकंदरीत असं आहे की कुठल्याही कोणत्याही प्रकारचे बंधन नकोय.“आम्ही दोघी” चित्रपटात सुद्धा सावी रामच्या प्रेमात आकंठ बुडालेली असली तरी तिला लग्नाच्या बंधनात अडकायचे नसते. सावी प्रमाणे कित्येक कपल्स मध्ये पाहिलंय त्यांच्यामध्ये प्रेम खूप आहे पण लग्न हि जबाबदारी नकोय. “कशाला हवय लग्न?” “चाललंय ते बरं चाललंय” “नको ती बंधनं”....
सध्या का होतंय असं?? आजकाल मुलगा असो वा मुलगी त्यांचे विचार खूपच प्रगल्भ झाले आहेत. कोणतीही गोष्ट करताना ती का करायची ? जर नाही केली तर काय होईल? केली तर काय होईल? याचा सारासार विचार करून मगच निर्णय घेतला जातो. लहानपणापासून आपण मनसोक्त, मनमुराद जगत आलेलो असतो. आई वडिलांनी कधी कोणतं बंधन घातलेलं नसतं. त्यात जेव्हा लग्नासाठी मुलींना लग्नानंतर तुला जॉब सोडावा लागेल, रात्रीच्या शिफ्ट्स चालणार नाही, याचाशी बोलू नकोस त्याच्या सोबत जाऊ नको, हे असे कपडे घालू नकोस, केस कपू नको, लग्नानंतर तु गाऊ नकोस, डान्स केलेला चालणार नाही.... अशा बऱ्याच गोष्टी लागू होतात. आणि सगळ्यात हाईट “मुलापेक्षा मुलीचा पगार जास्त नको(सो कॉल्ड मेल इगो हर्ट होतो). अशा विविध अटी, विविध मागण्या ऐकून तर अजूनच मूड जातो. कशाला अशा बंधनात जगावं? असा विचार येतो. त्यात आपण कमावते असलो कि झालंच मग तर अजूनच एकटं राहण्याचा विचार पक्का होतो..
स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, करिअरमध्ये विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी लागणारे वेळेचे गणित, शारीरिक कष्ट, मानसिक समाधान, करिअर मधील मोठे ध्येयं गाठताना पडणाऱ्या जबाबदाऱ्या अशा नानविध गोष्टींसाठी एकटं राहणं मुलीना योग्य वाटतं. आणि जरी तिला पार्टनर हवा असेल तर या सर्व गोष्टींशी अनुरूप, तिच्या शिक्षण आणि करिअर मध्ये साथ देणारा मिळत नाही. या सर्व कारणांमुळे एकट राहण्याची सवय लागते.
आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण यामुळे विचार खूपच पुढे गेले आहेत. त्याच त्या चौकटीत न राहता करिअर मध्ये उच्च स्थानावर, हवं तसं शोप्पिंग, गाडी, स्वत:चं घर/बंगला, फॉरेन ट्रीप, ट्रेकिंग, आपले छंद अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या तिला पूर्वीपासून परंपरागत आलेल्या रुढीमुळे करता आल्या नाहीत त्या ती एकट राहून बिनधास्त करू शकते.
शेवटी काय लाईफ एकदाच मिळते, आणि ज्या गोष्टीने आनंद मिळेल ती गोष्ट तर नक्कीच केली पाहिजे. नाही का ?