Thursday 14 November 2013

Sports Reality



खोला बॉक्सनिकला सामोसा

काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पुरस्काराला जाण्याचा योग आला. हा कार्यक्रम शहरापासून जरा दुर होता. पुरस्कारार्थी सगळे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे पहिली ते नववी पर्यंतचे मुल-मुली त्यात होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. आपल्याकडे लग्नाला जायच म्हटलं कि लोक थोड उशिरा जातात, कारण असतं कि भारतात लग्न कधी वेळेवर सुरु होत नाहीत. परंतु, शाळेत भेट द्यायला कुणी 'मोठा व्यक्ती' येणार असेल तर मुलांना किमान एक-दोन तास तरी वेळेच्या आधी बोलावून घेतात. या कार्यक्रमाचं देखील असंच झालं. कुणी मंत्री संत्री येणार होते ज्यांचा हस्ते मुलांना पुरस्कार दिले जाणार होते. बारा वाजताच्या कार्यक्रमाला या मुलांना दहा वाजताच आणून बसवलं  होतं. 

क्रीडा विश्वात खेळाडू काय काय कामगिरी करतात हे सामान्य लोकांना कधीच कळत नाही. बिग बॉस मध्ये एक गेम अशी होती कि त्यामध्ये घरातील सदस्यांना स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून स्वतःला पॉईण्ट्स द्यायचे होते. यामध्ये संग्राम सिंग हा खेळाडू असून त्याने काय कामगिरी केली हे घरातील सदस्यांना काय दर्शकांना देखील माहित नव्हते पण जेव्हा सलमान खानने शनिवारचा भागात त्याची कामगिरी सांगितली तेव्हा सर्वचजन थक्क झाले. भारतात फक्त काही ठराविक खेळाडूच सामान्य लोकांच्या ओळखीचे आहेत उदा. सचिन, धोनी, विराट  म्हणजेच जे क्रिकेट मध्ये आहेत फक्त तेच … बाकी खेळाडू कोणाच्या खिजगणतीत देखील नाही. 

माझी एक मैत्रीण अथलेटीक्स मध्ये होती,  ती सांगायची तिचा प्रक्टिससाठी होणारा खर्च आणि तिला मिळणाऱ्या  पुरस्काराची रक्कम म्हणजे "चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला" अशी तर्हा होती. आजच्या कार्यक्रमात देखील असच काहीसं झालं होतं एक वाजत आला होता तरी कार्यक्रम सुरु झाला नव्हता. सकाळी दहा वाजता येउन बसलेली मुलं दुपारी एक वाजेपर्यंत भुकेनं तळमळत बसली हो. शेवटी मंत्रीमहोदय तर आलेच नाही पण जे कोणी प्रमुख? पाहुणे आले होते त्यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम सव्वाला सुरु झाला. मुलांचे त्या कार्यक्रमात लक्ष पण नव्हते त्यांचं लक्ष होतं इथून बाहेर कसं पडता येईल आणि काहीतरी कसं खाता येईल. कसाबसा तो कार्यक्रम  दिमाखात? पार पडला. गेटजवळ मिठाईचे बॉक्स वाटप सुरु होतं. सगळी मुलं तिकडे तुटून पडली. आम्ही तिथेच बसलेलो होतो. एका साईडला  मिठाई वाटप आणि दुसऱ्या  बाजूला बुफेची मांडणी चालली होती. मुलांना एकेक बॉक्स देऊन त्यांची रवानगी केली.  इतका वेळ आम्हाला वाटलं कि बुफे या मुलांसाठीच आहे परंतु तो फक्त मंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी होता. तो  बॉक्स मिळवण्यासाठी मुलं भांडत बसली होती. वाटप करणारा मधेच मुलांवर ओरडत होता, त्यांना ढकलत होता.  एकदाचे ते  मिठाई वाटप संपले. काही मुलं उशिरा आली त्यांना पकडून आणून त्या वाटप करणार्याने बॉक्स त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला "खा रे!! खेळाडूंनी खायचं असतं दणकून(मला तिथे जाऊन त्याला दोन दणकून द्याव्यास्या वाटल्या, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता)!! खा रे! ! खा! !एवढेसे खाल्यावर कसं परफॉर्म करणारप्रत्येकाला उत्सुकता होती या रंगबिरंगी बॉक्स  मध्ये काय असेल?? सभागृहाच्या बाहेरच्या कट्ट्यावर मुले बॉक्स खोलून खात बसली होती. त्यात काय होते तर दोन सामोसे, एक लाडू, एक फ्रुटी? सकाळपासून उपाशी असलेल्या मुलांसाठी(भावी खेळाडूंसाठी) फक्त एक  मिठाईचा बॉक्स? दुसर्याच बाजूला काही पाहुणे होते ज्यांना काही खाण्याची देखील इच्छा नव्हती तरी त्यांना जबरदस्तीने बॉक्स दिले जात होते आणि वरती जेवणाचे आमंत्रण देखील दिले जात होते. 

आपल्या देशात ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना काही दिले जात नाही आणि जे खाऊन-पिऊन सुखी असतात त्यांनाच खाण्याचा आग्रह केला जातो. इतर देशात खेळाडूना चांगले खाणे आणि प्रशिक्षणहि दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे पदकांची संख्या वाढतच जाते.  ती मुले त्या एका बॉक्स वर खुश झाली, पण खेळाडूंना असंच खाणं मिळत राहिलं तर तुम्ही त्यांचाकडून पदकं मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकता ???

Saturday 5 October 2013

No-Mobile-Phone Phobia

        काल रविवार असल्याने आमच्या सगळ्या कंपू ला सुट्टी होती त्यामुळे भेटायचं ठरलं. खूप दिवसांनी भेटलं कि बरंच काही बोलायचं असतं. मुलांचं माहित नाही पण मुलींना खूप दिवसांनी असो किंवा दिवसातून खूप वेळा असो बोलायचा कधीच कंटाळा येत नाही. शॉपिंग, ज्वेलरी, बॉयफ्रेंड, सिनेमा… वगैरे वगैरे …  अशा नानाविध विषयांवर गप्पा चालू असतात. खुप दिवसांनी भेटणार असलो कि मैत्रीनींमध्ये मिरवायला (किंवा जेलस करायला) नविनातला नवीन ड्रेस, किंवा नुकतंच खरेदी केलेल्या गोष्टी घालायच्या असतात. आम्ही भेटलो 'हाय' 'हेलो' झालं, काय खायचं ते मागवलं. पण गप्पा मारायला भेटलेलो आम्ही आपापल्या मोबाईल मध्ये मग्न झालो.  वालपेपर, गाणी एकमेकांना 'सेंड' करत बसलो. कोणी काय ड्रेस घातलाय किंवा कोणी कुठली ज्वेलरी घातली याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. सगळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी फोटो काढत बसले होते.….  काही एकमेकींचे….  काही मागवलेल्या खाण्याचे.… 

        पूर्वी भेटलं कि कित्तेक विषयावर गप्पा व्हायच्या. आता प्रत्यक्ष भेटून गप्पा न होता 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात. सतत व्हाट्स अप चालू असतं. त्या दिवशी माझा एक मित्र म्हणतो तुझाशी कसं बोलणार तुझ्याकडे तर व्हाट्स अपच नाहिये. मी फक्त अशाच लोकांशी बोलतो ज्यांच्याकडे व्हाट्स अप, वी-चाट, लाईन आहे. मग त्याचावरून आमच्यात बराच वाद झाला. शेवटी वाद कोणाच्यातही असला तरी नेहमी मुलीच जिंकतात. आता तो स्वतःच मेसेज करतो, फोनही करतो कधीतरी. सांगायचा मुद्दा हा कि सध्या 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात, भेटून बोलायला कोणालाच वेळ नसतो. भेटलं तरी पूर्वीसारखं बोलणं होत नाहि. घरचे पण हेच बोलत असतात, काय आजकालची मुलं, नुसता त्या डबड्याला (मोबाईल) चिकटलेली असतात.

        त्या दिवशीच्या रात्री असंच विचार करत बसले तेव्हा लक्षात आलं कि, एवढा वेळ सोबत होतो पण कुणी कोणता ड्रेस घातला होता, कुणी काय खाल्लं याकडे कोणाचं लक्षहि नव्हता. फक्त समोरासमोर असूनही व्हर्चुअली एकत्र होतो. सध्या भेटणं होतं ते फक्त मोबाईलचं! दिवसातून फक्त एकदाच नाही तर प्रत्येक क्षणाला, त्यामुळे तो थोडाजरी नजरेआड गेला तरी करमत नाही. मग तो जवळ असल्याचे भास व्हायला लागतात.

        मोबाईल जवळ नसला कि शोधायचा, रिंग वाजत नसली तरी ती वाजतेय असे वाटलं, मेसेज आला नसला तरी मेसेज ची रिंग ऐकू यायला लागली कि समजायचा कि 'नोमोफोबिया' झालाय. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल जवळ नसणे.  असं थोडंजरी तुमचा सोबत होत असेल तर जास्त घाबरायचा नाही. फक्त थोडसं मोबाइलला दूर ठेवायचं. जास्त मेसेज मेसेज खेळत नाही बसायचं. तसं हे थोडंसं नाही पण बरंचस कठीण आहे माहितेय मला. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली कि त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली, ती जास्त प्रमाणात केली कि त्याचं व्यसन लागतं… आणि व्यसन लागलं कि ते लवकर सोड म्हटलं तरी सुटत नाही … सध्या प्रत्येकालाच हे व्यसन लागलंय.

हा आवाज ??? अरे किती वेळ झालाय ……  माझा फोन वाजतोय यार ……. ! :P

Tuesday 2 July 2013

नेहमी मीच का ???


   'मी तिच्यावर एवढं प्रेम केलं तरी ती मला का नाही मिळाली...' नेहमी माझा बाबतीतंच असं का होतं? नेहमी मीच का? 'मी एवढा अभ्यास केला तरी एटीकेटी लागलीच, तिनी जास्त अभ्यास न करता, तिला फस्ट क्लास मिळाला...' माझासोबतच हे व्हायचं होतं का?... आपल्या कानावर पडणारी ही नित्याची वाक्ये ... काही झालं तरी नेहमी मीच का म्हणून? अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का?

  कधी निवांत क्षणी असा विचार केला ना कि लक्षात येतं कि, हा पडणारा प्रश्न नेहमी ताण-तणाव, विनोदी प्रसंग, लाज आणणार्या गोष्टी झाल्यावरच पडतो. जसे कि, ऑफिसमध्ये सगळ्यात चांगलं काम केलेलं असलं तरी, प्रोमोशन दुसरंच कोणाला तरी मिळणार. सुट्टीचा दिवस गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत घालवायचा असेल तर नेमकं त्याच वेळी आईला घरच्या साफ-सफाई साठी तुम्ही हवे असता(इतर भाऊ-बहिण असतानादेखील) किंवा नेमकं तुमच्या खास मित्रांना तुम्हाला भेटायचं असतं. अशावेळी वाटतं हे माझासोबतच व्हायचं होतं. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्य बाबतीत देखील हेच, मी का म्हणून नेहमी लवकर यायचं आणि समोरच्याची वाट बघायची? दारुडे नवरे-सासुचा छळ सहन करण्यार्या सुना पण हेच म्हणतात. मीच का हा छळ सहन करायचा? भ्रष्टाचार करणारी नेतेमंडळी पकडले गेल्यानंतर देखील हेच म्हणत असणार, देशात इतर लोकसुध्दा भ्रष्टाचार करतात पण यांना पकडायला मीच बरा सापडलो? असे कितीतरी प्रसंग सांगता येतील जेव्हा आपल्या मेंदूत 'नेहमी मीच का? हा प्रश्न वळवळायला लागतो.

   कधी चांगली घटना घडल्यानंतर हा विचार केला का कि देवा हि चांगली घटना माझ्यासोबतच घडायची होती का? अनपेक्षित पणे निकाल चांगला लागला, अचानक लॉटरीचे तिकिट लागले, नोकरीत बढती मिळाली, आपल्याला आवडणारी मुलगी/मुलगा आपल्याशी आपण होऊन बोलायला आला, ऑफिस/कॉलेजला जाताना एकही सिग्नल लागला नाही अशावेळी आपण म्हणतो का, 'मीच का?' चांगलं झालं की कुणी त्याच्या नावाने ओरडत नाही पण वाईट काही झाले की नशीब आणि इतर सर्वांना त्यात सहभागी केलं जातं.

    हे जीवन सुंदर आहे, नेहमी नकारात्मक विचार करुन काहिच साध्य होत नाही. सकाळी लवकर मीच का उठावं हा प्रश्न डोक्यात आला कि विचार करा, काहि लोकांना तर दुसर्या दिवशीचा सूर्य देखील पाहता येत नाहि, झोपेतच ते जगाचा निरोप घेतात. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडची वाट पाहण्यात कसला आलाय मीपणा! विचार करा काहींना तर आपली आवडती व्यक्ती पण पटवता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला तर त्यांचा विचार करा ज्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील भीक मागावी लागते. सिग्नल लागला तर लागु दे कि तुझ्या भल्यासाठीच तर आहे ना तो! वृध्द आई-वडिलांना मीच का म्हणून सांभाळायचं, विचार करा त्या लोकांचा ज्यांनी कधीच आपल्या आई-वडिलांचे तोंड देखील पाहिले नाहि. एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला किंवा यासाठी मीच का हा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नक्की त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जी त्या गोष्टीपासून वंचित आहे, मग त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे 'Dont say WHY ME, say TRY ME.' हे जीवन जगण्यासाठी आहे. वर्तमानरुपी 'PRESENT' आहे, त्याचा हसतहसत स्वीकार करा. 

***






Monday 1 July 2013

. . . कितना बदल गया इन्सान!!!

भाग-१

   पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जायच्या, याच गरजामध्ये आता मोबइल(स्मार्टफोन्स्), इंटरनेट, बाईक/कार यांचा समावेश होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर ब्रॅन्डेड, लक्झुरियस बाईक/कार सर्रास दिसतात. या वाहनांमुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होते. ट्रॅफिक कितीही असले तरी काही मनमोहक कार नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात.  अशा कार फक्त लक्षच वेधुन घेत नाहीत तर एखाद्याचे प्राणही हिरावून घेतात.

   मला लहानपणीपासून मांजर आणि कुत्री (फक्त पिल्लु) खूप आवडतात, त्यादिवशी झालं असं, मी बसस्टॉपवर बसची वाट पहात थांबले होते. एक छोटसं पपी अहो कुत्र्याच पिल्लु हो! अस 'क्युट'सं, काळ कुळकुळीत! ते असं लुटूलुटू रस्ता पार करत होतं. त्याच वेळी समोरुन एक मनमोहक कार येत होती. पपी ची दिरंगाई आणि ड्रायव्हर ची घाई या दोहोंचा मेळ बसला नाही आणि क्षणार्धात पिल्लु चा निष्प्राण देह समोर दिसला. कार तर केव्हाच हवेच्या वेगाने पसार झाली, मागे वळूनही न पाहता...

   अशा वेळी मनात विचार येतो, ते पिल्लु एवढुसं छोटुसं असला म्हणून काय झाल. जर त्या पिल्लु च्या जागेवर एखादा मनुष्य प्राणी असता तर लगेच लोक जमा झाले असते. पोलिस कम्प्लेन्ट केली असती आणि बरच काही.. तो पपी एक छोटासा प्राणी म्हणून त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. 

भाग- २ 

   केदारनाथला गेलेल्या भाविकांची झालेली दशा आणि त्या महाकाय संकटातून सहीसलामत परत आलेल्या नागरिकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया आपण वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच दोन कुटुंबियांना भेटण्याचा नुकताच् योग आला. एका डोळ्यातून आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद तर दुसर्य़ा डोळ्यातून त्या कठिण प्रसंगात यमदुत समोर दिसत असताना इथून परत घरी जाऊ की नाही अशी अवस्था, असा दुहेरी मिलाप त्या पती-पत्नीच्या अश्रुंद्वारे दिसून येत होता. त्यांनी सांगीतलेल्या अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे; त्या संकटात ही मंडळी अडकली असताना तेथील नारिकांनी यांना मदत करण्यऐवजी स्वःतचा फायदा करुन घेत होती. अतिववृष्टी मध्ये पावसापासुन आसरा देण्यासाठी यात्रेकरुंकडून पैसे हिसकावून घेत होती. काही लोक पैसे न दिल्यास त्यांना खाली ढकलून देत होती. भारताची संस्कृती आहे 'अतिथी देवो भवः'! दुसर्या राज्यातून आलेल्या भाविकांचि मदत करण्यऐवजी त्यांनाच लुटले जात होते. कुठे गेली माणसाची माणुसकी? जवानांच्या मदतीने ही मंडळी सहीसलामत घरी आली परंतु बाकी लोकांचे काय? 

अशा वेळी म्हणावसं वाटतं

देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!
सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!!


***

Sunday 30 June 2013

Monsoon Memories


 
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...

शाळेत असताना 'पावसाळा' या विषयावर निबंध लिहिताना मी नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस 'एन्जॉय' करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले. 

पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या 'उपमे'च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार 'युनिक' फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात. 

प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते. हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो. 

कवी-कवयित्रीच्या भावना शांता शेळके यांच्या या कवितेतून दिसतात.....
झाडांवरी मुके, पाखरांचे थवेवीज लालनिळी, कशी नाचे लवेतेजाळते उभ्या अवकाशांत ग.
वीज कडाडतां, भय दाटे उरींएकलि मी इथे, सखा राहे दुरीमन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग. 

पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या सर्व रांगा  तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट न घालता बाईक ची राईड  म्हणजे अफलातूनच!

ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव घेताना दिसतात; सोबतच असतात गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची -प्यायची इच्छा होते. 

पावसाळ्यात सगळ्यात जास्त भाव खायला लागतात ती मंडळी म्हणजे मजनू-देवदास,  हृदय तुटलेली, 'तनहा दिल' लोक. जी उगीचच आपल्याला खूप दुःख झालय आणि या जगात आपल्याला शायरी करण्यापलिकडे काहिच उरला नाहीये अस वागतात. 

जसे कि माझ्यासारखे लोक ...

ये थन्डि हवा, ये हसीन वादिया, याद कर रहे है तुम्हे|
वो हमारी यादे, मिठी मिठी बाते, और साथ मे बीते हुये खास लम्हे || ❤❤❤

कुणी काही म्हणू, कुणी काही बोलू, पण प्रत्येक जण पाऊस एन्जॉय करतो तोही आपापल्या आगळ्या वेगळ्या रंगात आणि ढन्गात!!!

***


Thursday 27 June 2013

You- Me- and Rain

तू मी अन् पाऊस ...
 
आज तुझी आठवण यायला लागली ख़ुप;
म्हणून भेटायला आले विसरुन सारी तहान भूक,

पाहुन तुला समोर मला झाला आनंद;
पाऊस होता सोबत म्हणून मन झाले बेधुंद,

नकळत माझ्या धरला तु माझा हात;
म्हटला चल खाऊ कणीस एकसाथ,

कणीस ख़ाताना आला जरा तुला लळा;
काकांना म्हटलं  कणसात थोड लिंबू तरी पिळा,

तु, मी, बाईक अन् सोबत होता पाऊस;
म्हणून भिजायची फिटली पुरेपुर हौस,

भिजता भिजता पावसात झाली आपली मस्त 'राईड';
आता रात्री सर्दि, पडशासाठी आई करेल 'गाईड',

असाच पाऊस रोज रोज येऊ दे;
तुझी माझी भेट रोज रोज घडू दे.

***

                        



Sunday 16 June 2013

Break up ...

ब्रेक-अप.....
 
 'जब कोई बात बिगड जाएजब कोई मुश्कील पड जाएतुम देना साथ मेरा ओ हमनवाब
ना कोई हैना कोई थाजिंदगी में तुम्हारे सिवा, ओ हमनवाब'.... 

मी हे गाणं ऐकत होते तेवढ्यात 'तीमला भेटायला आली. पण तेव्हा ती नेहमीप्रमाणे नव्हती. नेहमीप्रमाणे म्हणजे सदा हसतमुखचॅपॅड चॅपॅड गप्पा मारणारीनॉन स्टॉप कुठल्याही विषयावर भाषण देणारीनवीन फिल्म यायच्या आधीच तिच प्रोमोशन करणारीरोज स्वत:विषयी भरभरून बोलणारीआज एकदमच शांत शांत होती. मग खूप विचारल्यावर बोलली 'फाइनली आमच चार वेळा ब्रेकअप-पॅचअप झल्यानंतर आता पुन्हा ब्रेकअप झालं आणि हे आता 'दि एण्डवाल ब्रेक अप झाल..... इत्यादी'. मला थोड्यावेळ असा वाटलं मी 'जब वी मेटमधली 'गीतआहेजी सगळ्यांच 'सॅड'गीत ऐकत असते आणि 'सोल्यूशनदेत बसते. मी तिला सांगून टाकल 'गेला ना सोडून जाउदेत तू चिल मार नाकशाला टेन्शन घ्यायचंमस्त ए जवानी है दिवानी पाहून ये. असा सुतकी चेहरा करून बसलीस ना तर त्याला जास्त आनंद होईल. तू दाखवून देमला माझं आयुष्य आहे आणि ते मी आनंदाने जगनारच!....इत्यादी

मला हा प्रश्न नेहमी पडतोजर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ती आहे तस स्वीकारलेलं असतंतर हा 'ब्रेक-अपनामक कीडा असा कसा या नाजूक नात्यात घुसून त्याला पोकळ करतो. एखाद्या व्यक्तीशी आपण मानसिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या एकत्र आलेलो असताना ही 'ब्रेक-अपची फॅशन का मधे मधे करते. जन्म झाल्यानंतर आपण आईवडिलभाऊबहीण ...  विविध नात्यांनी आपोआपच बांधले जातो. रक्ताची नाती म्हणतात त्याला. या नात्यांप्रमाणेच 'त्याच अन् तिचनातं का होऊ शकत नाहीआई-वडिलांशीभावा-बहिणीशी भांडण झालं की आपण त्यांचाशी ब्रेक-अप तर नाही ना करतमग इथेच का ब्रेक-अप करतात ही लोकरिलेशनशिप  सुरू करताना समोरच्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडत असतात(आवडत असल्याचा उगीचच आव आणला जातो). सगळंच सुरुवातीला आलबेल असतं. हळूहळू कळायला लागतंआपल्याच्याने नाही झेपणार समोरची व्यक्ती आणि मग खटके उडतात. भांडण होतात अन् मग ब्रेक-अप होत. समोरच्या व्यक्तीला ती आहे  तसं स्वीकारलं की असलं ब्रेक-अप वगैरेचा पर्यायच  नाही राहत. 

काल अचानक मला 'ती'ची आठवण आली म्हणून तिला फोन केला. इकडची तिकडची हालहवा विचारून झाल्यावरतिनेच सांगायला सुरूवात केली. 'तीआता पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. आणि आत्ताचा 'तोतिला "हवा तसा" (अगदी परफेक्ट) आहे. बरीच खुश होती ती. मी फोन ठेवला. म्हटलं चला खुश आहे ना ती(?) मग ठिके! आणि मी कॉफी बनवत बनवत गुणगुणत बसले .....

'दिल संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू
दिल यहीं रुक जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू!!! ❤❤❤





Friday 26 April 2013

What to do now ?

आता काय करावे?



सध्याची पिढी काही झालं कि लगेच प्रत्येक गोष्टीत 'बोर'/कंटाळा  होते. सतत काही ना काही चालू असल्याने काही करायला नसल की जीव कासविस होतो आणि विचार येतो आता काय कराव.... बर्‍याच लोकांना हा प्रश्न सतावतो 'आता काय करावे?' 


जेव्हा हा प्रश्न डोक्यात येतो तेव्हा लोक साधारणत: पुस्तक वाचतातपण जेव्हा आपण काही करायला नाही म्हणून पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपण त्या पुस्तकाचा अपमान करतोय, असा नाही वाटत काआपण कितीही 'बोर' झालो तरी आपल्याकडे कितीतरी असंख्य गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो परंतु आपण त्या करत नाही. मला तर असा वाटत 'ज्या लोकांना काय कराव हा प्रश्न पडतो ती लोक स्वतःवर प्रेमच करत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तिशिवाय  किंवा एखाद्या  समुहाशिवाय स्वतःसोबत का राहू शकत नाही.  तुम्ही स्वत:च स्वत:चा कंटाळा कसा करू शकता? आपण आपल्या स्वत:ला कसे 'बोर' होऊ शकतो? म्हणजे आपल्यालाच आपली किंमत नाही, असाच त्याचा अर्थ होतो की... जर आपणच आपल्याला किंमत देत नसू तर लोक कशी देणारस्वत:च स्वत:ला 'बोर' होण्यसारखे दुर्दैव नाही.


नेहमी मित्र-मैत्रिणिंचा गराड्यात असल्याने, सतत मोबाईल वर 'चॅट'त बसल्याने आपला स्वत:शी संवादच थांबला आहे आणि आपल्या डोक्यात काही करायचे असले तरी ते प्रत्यक्षात उतरत नाही आणि विचार येतात आता काय करूहा प्रश्न पडला की बरेचजण फ्रीज उघडल्यासारखे फेसबुक 'चेक' करतात. तिथे काही दिसले नाही की मग 'रॅंडम' मेसेज पाठवत बसतात. इथेहि 'रिप्लाय' नाही आला की 'बोर' होते. मग पुन्हा सुरू होते... आता काय कराव??

हा प्रश्न न पडण्यासाठी आपल्याकडे छंद हवेतनसले तरी नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ करायची हौस असावी. तुम्ही म्हणाल हा काय  फाल्तूपणा आहे, इथे जे करायला दिल आहे तेच करायला वेळ नाही आणि म्हणे वेगळा करायची हौस! जेव्हा अस कधी वाटते ना तेव्हा उठून बस-स्टॅंड रेल्वे स्टेशन ला जायच असली चित्र विचित्र लोक दिसतात ना.. तिथे नुसतं थांबलं तरी लोक विचारतात 'अमुक ही बस/ रेल्वे कुठे जाते? मला तमक्या ठिकाणी जायचे आहे कसे जाउ?' तिथे कंट्रोलर् असून ही तुम्हाला विचारले जाते. काही लोक रेल्वे पकडण्याचा मागे  लागलेली असतात, कुली सामान घेऊन चाललेला असतो, लोक एकमेकांना टाटा-बाय करत असतात, काही लोक खूप दिवसांनी आपल्या आवडत्या व्यक्तीना भेटलेले असतात. काही भिकारी तिथेच जागा मिळेल तिथे लवंडलेले असतात. तुमचा वेळ कसा गेला तुम्हालाही नाही कळले आणि  आता काय करावे? या प्रश्नाचे उत्तरही मिळाले. अस सगळ्याच ठिकाणी थोड्या अधिक फरकाने सारखच पहायला मिळत.

निदान जेव्हा काय करावे?? हा प्रश्न पडतो तेव्हा एखाद्या ठिकाणच निरीक्षण ही एक साधी गोष्ट लक्षात आणली तरी बर्‍याच  गोष्टी विलोभनीय वाटायला लागतात. चला आता मला काय करायचा हा प्रश्न ''सोल्वड' झाला. त्यामुळे थोडफार काही लिहून तरी झालं. 

आता पुनश्च आता काय करावे?! ☺☺☺



जागतिक महिला दिन

फक्त आजच्याच दिवसासाठी नाही तर रोजच... तू सर्व काही करते .. घरापसून ते चंद्रमोहिमे पर्यंत सगळ्याच क्षेत्रात तुझा वावर आहे.. तू शिकली आणि शहा...