Sunday, 20 May 2018

Turning 30!!!

''टर्निंग ३० वगैरे '' ! ! ! 

वाढदिवस!! दरवर्षी येणारा दिवस!! “नेमेची येतो वाढदिवस”!! काहींना फार कौतुक असतं या दिवसाचं.. एक महिना आधीपासून ते वाढदिवस होऊपर्यंत लोकांना आठवण करून देत राहतात ... मला हे गिफ्ट द्या, ते गिफ्ट द्या! आणि काहींना अजिबातच कौतुक नसतं, तो  दिवस कधी आला आणि कधी गेला कळत पण नाही, त्यांच्या दृष्टीने एवढा काय असत त्या वाढदिवसात? दरवर्षी येतो आणि एक वर्ष कमी करून जातो. पण प्रत्येकाची आठवण, साठवण, प्लानिंग वेगवेगळ असतं. वाढदिवस झाल्यावर एक वर्ष कमी होतं कि वाढतं?? २० मधून २१ मध्ये जातो २९ मधून ३० मध्ये जातो. एका अर्थाने वाढतोच, असं मला वाटतं. काही म्हणतात १ वर्ष कमी होत जात, जर आपल्याला माहितीच नाही आपण किती वर्ष जगणार मग आपण त्या वर्षातून कमी कसं करणार . .. असो .. लॉजिक प्रत्येकाचं वेगळंच असतं प्रत्येक गोष्टीत.

सो.... हा वाढदिवस माझ्यासाठी जरा खास आहे... कारण २९ मधून ३० मध्ये जाणार .. म्हणजे सो कॉल्ड ‘टर्निंग ३०’ वगैरे .. हा जो ३० आकडा आहे ना, यामागे बरीच गणितं लपलेली असतात. मुलींसाठी “काय गं कितवा वाढदिवस?” “३० ची झाली तू ?” “अजून लग्न नाही झालं?” “कुणी बॉयफ्रेंड नाही का?” “किती उशीर?” “हल्ली या करियर ओरीयेन्तेड मुलींचं असंच असतं, नकोच म्हणतात लग्नाला” “एकट कसं राहणार?  “तुझा वयाची मुली बघ, त्यांना मुलं झाली बघ” पण या सगळ्यात तुम्हाला कुणी असं नाही म्हणत “काय गं कुठल्या पदावर आता?” “इतक्या कमी वयात खूप काही अचीव केला गं” “किती इनडिपेंडेंत झालीये तू?” “सगळं कस एकट हेंडल करते” “घरासोबत बाकी गोष्टी सुद्धा व्यवस्थित निभावून नेतेस”.. “किती मेंटेन केलंय स्वत:ला ३० वगैरे अजिबातच वाटत नाही”.....

३० हा आकडा आपल्या आयुष्याचा सुवर्णमध्य असतो. तुम्ही मच्युअर वगैरे झालेला असता. बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतात. कुठल्या गोष्टीला किती प्राधान्य द्यायचा, किती इमोशनल राहायच, म्हणजे बऱ्याच जणांच आयुष्य “सेट” झालेलं असतं. नोकरी, घर, गाडी सगळं बर्यापैकी मिळून गेलेलं असतं. आयुष्यात काय करायचा आणि काय करायचा राहिलंय ते कळत असतं. काही जन तर ३० पर्यंत सगळं आयुष्य जगलेले असतात. ३० क्रॉस केलेले मला तर २-३ जन असं पण म्हटले “बास झालं यार, सगळं करून झालं, काही राहिलच नाही आयुष्यात असं जे करायचा आहे. मी ठरवलेल्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि बऱ्याच बाकी आहेत. आकड्यानुसार अर्ध आयुष्य संपलं पण मला मी तिशीत गेलीये असं अजिबातच वाटत नाही. “अभी तो  मैं जवान हूं!” असलं फिलिंग आहे.    

सगळ्यांना समोरच्याचं आयुष्य खूप सुंदर वाटतं आणि आपलं किती बोर चाललंय असं वाटतं. पण असं नसतं! आय टी मधल्या माझ्या मित्र-मैत्रीणीना बघितला कि वाटतं, ऐश आहे यांची ५ दिवस काम करायचा मस्त, आणि शनिवार-रविवार बाहेर फिरून यायचा. पण असं काही नसत! त्यांना माझं काम जास्ती एक्सायटिंग वाटतं, सारखं इकडे तिकडे फिरणं .. कधी कधी सेलिब्रिटी सोबत फिरणं फोटो काढणं. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आपापल्या वेळेनुसार मिळत असते. माझ्या कॉलेज मधल्या बऱ्याच मैत्रिणी लग्न होऊन परदेशात सेटल झाल्या आहेत. त्यांना बघितला कि आपल्या ३० च्या आत करायचा गोष्टी मधली हि गोष्ट राहून गेली आहे हि खंत वाटते, “बट कोई नहीं, नेक्स्ट बड्डे इन फॉरेन. प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळ असतं उगीच दुसर्यांशी तुलना करून त्याची जगण्याची मजा कमी नको करायला. प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं आणि हटके करायचा. आपण बकेट लिस्ट बनवतो ना, काही लोक सगळ्यांना सांगत सुटतात आणि काही लोक मनात ठेवतात आणि हळूहळू एक एक गोष्ट करत राहतात.....

आपण ३० चे झालो म्हणजे आपण म्हातारे झालो किंवा आपल्याला आता काही करता येणार नाही. आपल्या वयाला हे शोभेल का? लोक काय म्हणतील? आपल्या वयाच्या मुला-मुलींची लग्न झाली. त्यांना मुल-मुली झाल्या आपलं अजून कशातच काही नाही. असं वाटून घ्यायची काही गरज नाही. कारण हीच लग्न झालेली लोक तुझी मज्जा आहे बाबा, नको लग्नाच्या भानगडीत पडू वगैरे म्हणतात. त्यांना आपलं आयुष्य भारी वाटतं आणि आपल्याला त्याचं आयुष्य भारी वाटतं.....

सो जुलिया लोईझा ने म्हटल्या प्रमाणे "I know people who graduated college at 21, and didn't get a salary job until they were 27. I know people who graduated at 25 and already had a salary job. I know people who have children and are single. I know people who are married and had to wait 8-10 years to be parents. I know people who are in a relationship and love someone else. I know people who love each other and aren't together. There are people waiting to love and be loved. My point is, everything in life happens according to our time, our clock. You may look at your friends and some may seem to be ahead or behind you, but they're not. They're living according to the pace of their clock, so be patient. You're not falling behind, it's just not your time." - Julissa Loaiza”




“टर्निंग ३० असो अथवा टर्निंग ४०” आपलं आयुष्य, आपल्याला हवं तसं जगावं! शेवटी काय लाईफ एकदाच मिळते, आणि ज्या गोष्टीने आनंद मिळेल ती गोष्ट तर नक्कीच केली पाहिजे. नाही का ? 

Wednesday, 9 May 2018

Marriage

लग्न पहावे (न) करून 


ऑफिस मध्ये त्या दिवशी ठीक वाटत नव्हते म्हणून दवाख्यान्यात चेक अप करायला गेले. नेहमीप्रमाणे गर्दी भरपूर होती. (हे क्लिनिक एकतर इतके छोटे असतात, ५ लोक आली तरी क्लिनिक भरून जातं, म्हणजे बाकी लोकांना वाटायला किती वर्दळ असते इथे..) १-२ तास थांबल्यानंतर माझा नंबर आला. आत गेल्यावर हि टेस्ट ती टेस्ट करून झाली, रिपोर्ट येउपर्यंत थांबावे लागणार होते. मग मी तिथेच बसले जरावेळ. तर डॉक्टर ची असिस्टंट  एकदम जवळ येत (रक्त घेताना बहुतेक रक्त कमी आणि केस जास्त बघत होती वाटतं) “काय गं तुझे केस पांढरे झाले?” मी “हो! मग?” ती “इतक्या लवकर कसे?” “वय किती?” मी जरा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहिले, ती “लग्न झालाय का?” मी “नाही” ती “कसं गं तुम्हा पोरींचं, एवढ्या लहान वयात केस पांढरे? त्यात लग्न पण नाही झालं, कठीण आहे. कोण लग्न करणार?” आणि तोंड वाकडा करून निघून गेली.....आणि मी आवाक होऊन... हिला काय करायचं माझा लग्न होऊ नाहीतर नाही होऊ. फुकटचे सल्ले...     

कारणं काही असो सिंगल मुलगी दिसली कि असलं काहीतरी कानावर पडतच, समोरून नसेल तर आपल्यामागे बोलतातच. पण सध्या मुलीना असं काही फरक पडत नाही. लग्नानंतर च्या जबाबदाऱ्या, कराव्या लागणाऱ्या अड्जस्टमेंट, आजूबाजूला लग्न झालेली लोकं आणि त्यांचे प्रोब्लेम्स, त्यांची घर-ऑफिस दगदग,मुलांचं संगोपन, आजारपण, अफेअर्स या सगळ्यात न अडकता हवं तसं पाहिजे तसं राहण्याच्या स्वातंत्र्यासाठी बऱ्याच मुली आहेत ज्यांनी जाणूनबुजून सिंगल राहायचा विचार केलाय. तसं एकटं राहण्याचा विचार बऱ्याच जणांच्या(मुलगा असो वा मुलगी) डोक्यात येतो, त्यात लग्न न झालेले, लग्न झालेले, सध्या रिलेशनशिप्स मध्ये असणारे आणि खूप सारे रिलेशनशिप्स करून झालेले पण असतात. तर एकंदरीत असं आहे की कुठल्याही कोणत्याही प्रकारचे बंधन नकोय.“आम्ही दोघी” चित्रपटात सुद्धा सावी रामच्या प्रेमात आकंठ बुडालेली असली तरी तिला लग्नाच्या बंधनात अडकायचे नसते. सावी प्रमाणे कित्येक कपल्स मध्ये पाहिलंय त्यांच्यामध्ये प्रेम खूप आहे पण लग्न हि जबाबदारी नकोय. “कशाला हवय लग्न?” “चाललंय ते बरं चाललंय” “नको ती बंधनं”....  

सध्या का होतंय असं?? आजकाल मुलगा असो वा मुलगी त्यांचे विचार खूपच प्रगल्भ झाले आहेत. कोणतीही गोष्ट करताना ती का करायची ? जर नाही केली तर काय होईल? केली तर काय होईल? याचा सारासार विचार करून मगच निर्णय घेतला जातो. लहानपणापासून आपण मनसोक्त, मनमुराद जगत आलेलो असतो. आई वडिलांनी कधी कोणतं बंधन घातलेलं नसतं. त्यात जेव्हा लग्नासाठी मुलींना लग्नानंतर तुला जॉब सोडावा लागेल, रात्रीच्या शिफ्ट्स चालणार नाही, याचाशी बोलू नकोस त्याच्या सोबत जाऊ नको, हे असे कपडे घालू नकोस, केस कपू नको, लग्नानंतर तु गाऊ नकोस, डान्स केलेला चालणार नाही.... अशा बऱ्याच गोष्टी लागू होतात. आणि सगळ्यात हाईट “मुलापेक्षा मुलीचा पगार जास्त नको(सो कॉल्ड मेल इगो हर्ट होतो). अशा विविध अटी, विविध मागण्या ऐकून तर अजूनच मूड जातो. कशाला अशा बंधनात जगावं? असा विचार येतो. त्यात आपण कमावते असलो कि झालंच मग तर अजूनच एकटं राहण्याचा विचार पक्का होतो..  

                         

स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, करिअरमध्ये विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी लागणारे वेळेचे गणित, शारीरिक कष्ट, मानसिक समाधान, करिअर मधील मोठे ध्येयं गाठताना पडणाऱ्या जबाबदाऱ्या अशा नानविध गोष्टींसाठी एकटं राहणं मुलीना योग्य वाटतं. आणि जरी तिला पार्टनर हवा असेल तर या सर्व गोष्टींशी अनुरूप, तिच्या शिक्षण आणि करिअर मध्ये साथ देणारा मिळत नाही. या सर्व कारणांमुळे एकट राहण्याची सवय लागते.

आर्थिक स्वातंत्र्य आणि शिक्षण यामुळे विचार खूपच पुढे गेले आहेत. त्याच त्या चौकटीत न राहता करिअर मध्ये उच्च स्थानावर, हवं तसं शोप्पिंग, गाडी, स्वत:चं घर/बंगला, फॉरेन ट्रीप, ट्रेकिंग, आपले छंद अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या तिला पूर्वीपासून परंपरागत आलेल्या रुढीमुळे करता आल्या नाहीत त्या ती एकट राहून बिनधास्त करू शकते.  

                         

शेवटी काय लाईफ एकदाच मिळते, आणि ज्या गोष्टीने आनंद मिळेल ती गोष्ट तर नक्कीच केली पाहिजे. नाही का ? 

Monday, 30 April 2018

NUDE

कपड़ा जिस्म पे पहनाया जाता है , रूह पे नहीं...




‘नावात काय असतं’ असं शेक्सपियर म्हणून गेलाय, पण नावातच बरंच काही असतं. NUDE (न्यूड) असं काही वाचलं कि लगेच भुवया उंचावल्या जातात. अश्लीलता, वासना वगैरे डोळ्यासमोर येते. पद्मावत नंतर नुसत्या नावावरून या चित्रपटाला विरोध दर्शवला गेला होता, म्हणून पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.

‘न्यूड’ हि यमुना आणि तिची मावशी चंद्राक्का यांची कथा आहे. आपल्या मुलाला खूप शिकवून मोठं करायचं बास एवढच यमुनाच्या डोक्यात असतं. नवरा दारुडा त्यामुळे त्याचा संसाराला आर्थिक हातभार कमी तर असतोच वर ती जे काय कमवते त्यावर त्याचा डोळा आणि हे कमी कि काय म्हणून माणिक सोबत त्याचे विवाहबाह्य संबध असतात. अशा या जाचाला कंटाळून ती मुलासह मुंबईला तिच्या मावशीकडे येते. मुंबईला आल्यावर ती अनेक दिवस काम शोधते. पण काही केल्या तिला काम मिळत नाही. तिची मावशी एका आर्ट कॉलेजमध्ये शिपाई म्हणून काम करत असते आणि शिपायाचे काम करण्यासोबतच ती ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करत असते. विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी हे करण्यात काहीच चुक नाही असे तिचे म्हणणे असते आणि यासाठी तिला चांगला पैसा देखील मिळत असतो. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे हीच केवळ यमुनाची इच्छा असल्याने ती देखील हे काम करायला लागते. तिचे कामाबद्दलचे प्रेम, मुलाला मोठे बनविन्याचे स्वप्न.. इथून पुढे  सुरु होतो यमुनाचा न्यूड मॉडेलचा प्रवास.

नावाप्रमाणे हा चित्रपट कुठेही आपली सीमा पार करत नाही कुठेही तो बोल्ड होत नाही. चंद्राक्का हे पात्र खूपच भाव खाऊन जातं. तिचा SWAG, बोलण्याची लकब, तिचा वट, तसंच यमुनेनं पैसे मिळवण्यासाठी ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करावं यासाठी तिला सुरुवातीला ‘त्यामध्ये काही गैर नाही’ असं म्हणत “बाईनं अंगावर कितीही कपडे घातले तरी पुरुषी नजरेतून तिच्या अंगावर तसा एकही कपडा नसतो” असं पटवून देणारी चंद्राक्का. कल्याणी मुळे नि यमुना अतिशय सुंदरपणे साकारली आहे, ‘न्यूड मॉडेल’ म्हणून सुरुवात करतानाचे एक्सप्रेशन, मुलाला समजावताना+त्याचे चांगले भवितव्य घडवीण्यासाठी, कलेचे स्वातंत्र्य जपावे यासाठी पाउल उचलणारी, तिचा अभिनय खूपच नैसर्गिक वाटतो. या चित्रपटाची सिनेमटोग्राफी खूपच सुंदर आहे. जी काही गाणी आहेत ती BACKGROUND ला साजेशी आहेत. संथ गतीने एक एक टप्पा पार करत चित्रपट पुढे सरकत जातो आणि सध्याच्या कलेची झालेली अवस्था दाखवून देतो. आपल्या अंदाजाने आपण कथेचा शेवट ३-४ प्रकारे डोक्यात ठेवतो; असं होईल तसं होईल पण होतं वेगळंच. या चित्रपटाचा शेवट म्हणजे खूपच मोठी चपराक आहे. काही वेळ आपल्याला सुन्न करून सोडणारा आहे. वेगळा आणि संवेदनशील विषय खूप चांगल्या प्रकारे मांडला आहे. आर्ट फिल्म आवडनार्यांनी हा चित्रपट पहायला हरकत नाही. ज्यांना मिर्च मसाला फिल्म्स आवडतात त्यांना बहुतेक नाही आवडणार. आणि हो चित्रपट बघताना SUBTITLE चुकून हि वाचू नये.


Friday, 22 July 2016

​10- 12 days without ​ ​(SMART)phone




स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःच्या डोळ्याचे ऑपरेशन होताना पाहणे म्हणजे कॉन्जुरिंग २ पाहण्यापेक्षाही डेन्जर होते. लहानपणीपासूनच डॉक्टर, दवाखाना यांची ऍलर्जीच म्हणावी लागेल. कधी त्याचा एवढा संबंध आला नाही ना. एकदा पडले होते आजारी..  तेव्हा एक्सरे काढायचा होता ५-१० मिनिटं लागणाऱ्या एक्सरे मध्ये २-३ दा चक्कर येउन पडली होती मी. त्यापुढे  कधी दवाखान्याचा संपर्क आलाच नाही. आत्ता आला तोही एका डोळ्याचे  ऑपरेशन करायचे म्हणून.

ऑपरेशन करून घ्यायचा माझा पहिलाच अनुभव; आणि आपल्या आवडत्या गोष्टीवर किंवा  इंद्रियावर असेल तर जास्तच टेन्शन असतं. ते नीट होईल का? काही अडचण तर नाही ना येणार? आपल्याला नीट दिसेल ना? अजून किती दिवस असा डोळा बंद राहील? डोळ्याचा नंबर तर नाही ना वाढणार? आणि वाढला तर असा मोठ्या भिंगाचा चष्मा लावावा लागणार... असे नानाविध विचार डोक्यात यायला लागतात.

एकदाचा तो दिवस उजाडला. डॉक्टर म्हणलेले १०-१५ मिनिटाच काम आहे जास्त वेळ लागणार नाही. अस बोलता बोलता होऊन जाईल...  ही डॉक्टर लोक असला भारी दिलासा देतात ना (?) एक नर्स जवळ आली तिच्या हातातल्या आय ड्रॉप मधले ३-४ थेंब (भसाभसा - काही कळायच्या आतच) डोळ्यात टाकले आणि बसा ५ मिनिट म्हटली. ५ मिनिटं झाली नंतर पुन्हा ती आली पाणी तिने आधीचीच कृती पुन्हा केली. आणि आत घेऊन गेली. आत जाता जाता वरील विचारांनी पुन्हा डोक्यात गर्दी केली.

दवाखान्यातल्या त्या बेड वर पडल्यावर नर्सने पुन्हा भूल देणारे ड्रॉप्स डोळ्यात टाकले आणि डोळा असा २-३ चिमटे लावून ठेवला. भूल दिल्याने काय चाललेय ते दिसत तर होते पण काही फील होत नव्हते .  डॉक्टर सांगत होते...आता इंजेकशन देतोय.. आता सिस्ट काढतोय... आता ते निघाला... सिस्ट आतमध्ये वाढल्यामुळे टाके टाकावे लागतील... मी ह्म्म्म, ओके ..  हा.. हो ..  बरं  करत होते...  आता टाके टाकतोय...  असं करत फायनली १५-२० मिनिटांत ओपेशन झाले. आणि ऑपरेशन झालेल्या डोळ्यावर हा भला मोठा कापसाचा बोळा लावला आणि माझा एक  डोळा काही दिवसांसाठी बंद झाला.

डॉक्टर तर म्हटलेले काही काळजी करायची गरज नाही १-२ दिवस सुट्टी घ्या आणि लगेच बरे वाटेल. म्हटलं चला १-२ दिवसात ऑफिस ला जाऊ लागू आणि कसलं काय दुसऱ्या दिवशी तर डोळाच उघडवेना इकडे तिकडे बघायला गेला की दुखायला लागायचा. घरच्यांनी सांगून टाकलं जोपर्यंत ठीक वाटत नाही तोपर्यंत नो ऑफीस, नो फोन (स्मार्टफोन), नो टीव्ही, नो लॅपटॉप - पीसी .. झालं एकटा  जीव सदाशिव !! रोज काळा  चष्मा लावून बसायचं. १०-१५ मिनिटांत झालेल्या ऑपरेशन ला १०-१५ दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं. नंतर अजून १५ दिवस टाके विरघळायला लागले. आणि सगळे टाके विरघल्यावर पीसी वरील माझे काम सुरू झाले.

पण ते १५-२० दिवस फोनशिवाय घालवणे म्हणजे दिव्य होते. :P व्हाट्स अप नाही, एफबी नाही, इंस्टाग्राम नाही, टीव्ही-मुव्ही नाही, ऑफिसला जाऊनही फक्त पीसी न वापरता येणारी कामे करायची. स्मार्टफोन, पीसी, सोशल मीडिया यांचे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे स्थान झाले आहे नाही. त्याशिवाय लाईफ मध्ये मजाच नाही असे वाटते.




Thursday, 14 November 2013

Sports Reality



खोला बॉक्स… निकला सामोसा …

काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पुरस्काराला जाण्याचा योग आला. हा कार्यक्रम शहरापासून जरा दुर होता. पुरस्कारार्थी सगळे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे पहिली ते नववी पर्यंतचे मुल-मुली त्यात होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. आपल्याकडे लग्नाला जायच म्हटलं कि लोक थोड उशिरा जातात, कारण असतं कि भारतात लग्न कधी वेळेवर सुरु होत नाहीत. परंतु, शाळेत भेट द्यायला कुणी 'मोठा व्यक्ती' येणार असेल तर मुलांना किमान एक-दोन तास तरी वेळेच्या आधी बोलावून घेतात. या कार्यक्रमाचं देखील असंच झालं. कुणी मंत्री संत्री येणार होते ज्यांचा हस्ते मुलांना पुरस्कार दिले जाणार होते. बारा वाजताच्या कार्यक्रमाला या मुलांना दहा वाजताच आणून बसवलं  होतं. 

क्रीडा विश्वात खेळाडू काय काय कामगिरी करतात हे सामान्य लोकांना कधीच कळत नाही. बिग बॉस मध्ये एक गेम अशी होती कि त्यामध्ये घरातील सदस्यांना स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून स्वतःला पॉईण्ट्स द्यायचे होते. यामध्ये संग्राम सिंग हा खेळाडू असून त्याने काय कामगिरी केली हे घरातील सदस्यांना काय दर्शकांना देखील माहित नव्हते पण जेव्हा सलमान खानने शनिवारचा भागात त्याची कामगिरी सांगितली तेव्हा सर्वचजन थक्क झाले. भारतात फक्त काही ठराविक खेळाडूच सामान्य लोकांच्या ओळखीचे आहेत उदा. सचिन, धोनी, विराट  म्हणजेच जे क्रिकेट मध्ये आहेत फक्त तेच … बाकी खेळाडू कोणाच्या खिजगणतीत देखील नाही. 

माझी एक मैत्रीण अथलेटीक्स मध्ये होती,  ती सांगायची तिचा प्रक्टिससाठी होणारा खर्च आणि तिला मिळणाऱ्या  पुरस्काराची रक्कम म्हणजे "चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला" अशी तर्हा होती. आजच्या कार्यक्रमात देखील असच काहीसं झालं होतं एक वाजत आला होता तरी कार्यक्रम सुरु झाला नव्हता. सकाळी दहा वाजता येउन बसलेली मुलं दुपारी एक वाजेपर्यंत भुकेनं तळमळत बसली हो. शेवटी मंत्रीमहोदय तर आलेच नाही पण जे कोणी प्रमुख? पाहुणे आले होते त्यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम सव्वाला सुरु झाला. मुलांचे त्या कार्यक्रमात लक्ष पण नव्हते त्यांचं लक्ष होतं इथून बाहेर कसं पडता येईल आणि काहीतरी कसं खाता येईल. कसाबसा तो कार्यक्रम  दिमाखात? पार पडला. गेटजवळ मिठाईचे बॉक्स वाटप सुरु होतं. सगळी मुलं तिकडे तुटून पडली. आम्ही तिथेच बसलेलो होतो. एका साईडला  मिठाई वाटप आणि दुसऱ्या  बाजूला बुफेची मांडणी चालली होती. मुलांना एकेक बॉक्स देऊन त्यांची रवानगी केली.  इतका वेळ आम्हाला वाटलं कि बुफे या मुलांसाठीच आहे परंतु तो फक्त मंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी होता. तो  बॉक्स मिळवण्यासाठी मुलं भांडत बसली होती. वाटप करणारा मधेच मुलांवर ओरडत होता, त्यांना ढकलत होता.  एकदाचे ते  मिठाई वाटप संपले. काही मुलं उशिरा आली त्यांना पकडून आणून त्या वाटप करणार्याने बॉक्स त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला "खा रे!! खेळाडूंनी खायचं असतं दणकून(मला तिथे जाऊन त्याला दोन दणकून द्याव्यास्या वाटल्या, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता)!! खा रे! ! खा! !" एवढेसे खाल्यावर कसं परफॉर्म करणार?  प्रत्येकाला उत्सुकता होती या रंगबिरंगी बॉक्स  मध्ये काय असेल?? सभागृहाच्या बाहेरच्या कट्ट्यावर मुले बॉक्स खोलून खात बसली होती. त्यात काय होते तर दोन सामोसे, एक लाडू, एक फ्रुटी? सकाळपासून उपाशी असलेल्या मुलांसाठी(भावी खेळाडूंसाठी) फक्त एक  मिठाईचा बॉक्स? दुसर्याच बाजूला काही पाहुणे होते ज्यांना काही खाण्याची देखील इच्छा नव्हती तरी त्यांना जबरदस्तीने बॉक्स दिले जात होते आणि वरती जेवणाचे आमंत्रण देखील दिले जात होते. 

आपल्या देशात ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना काही दिले जात नाही आणि जे खाऊन-पिऊन सुखी असतात त्यांनाच खाण्याचा आग्रह केला जातो. इतर देशात खेळाडूना चांगले खाणे आणि प्रशिक्षणहि दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे पदकांची संख्या वाढतच जाते.  ती मुले त्या एका बॉक्स वर खुश झाली, पण खेळाडूंना असंच खाणं मिळत राहिलं तर तुम्ही त्यांचाकडून पदकं मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकता ???

Saturday, 5 October 2013

No-Mobile-Phone Phobia

        काल रविवार असल्याने आमच्या सगळ्या कंपू ला सुट्टी होती त्यामुळे भेटायचं ठरलं. खूप दिवसांनी भेटलं कि बरंच काही बोलायचं असतं. मुलांचं माहित नाही पण मुलींना खूप दिवसांनी असो किंवा दिवसातून खूप वेळा असो बोलायचा कधीच कंटाळा येत नाही. शॉपिंग, ज्वेलरी, बॉयफ्रेंड, सिनेमा… वगैरे वगैरे …  अशा नानाविध विषयांवर गप्पा चालू असतात. खुप दिवसांनी भेटणार असलो कि मैत्रीनींमध्ये मिरवायला (किंवा जेलस करायला) नविनातला नवीन ड्रेस, किंवा नुकतंच खरेदी केलेल्या गोष्टी घालायच्या असतात. आम्ही भेटलो 'हाय' 'हेलो' झालं, काय खायचं ते मागवलं. पण गप्पा मारायला भेटलेलो आम्ही आपापल्या मोबाईल मध्ये मग्न झालो.  वालपेपर, गाणी एकमेकांना 'सेंड' करत बसलो. कोणी काय ड्रेस घातलाय किंवा कोणी कुठली ज्वेलरी घातली याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. सगळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी फोटो काढत बसले होते.….  काही एकमेकींचे….  काही मागवलेल्या खाण्याचे.… 

        पूर्वी भेटलं कि कित्तेक विषयावर गप्पा व्हायच्या. आता प्रत्यक्ष भेटून गप्पा न होता 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात. सतत व्हाट्स अप चालू असतं. त्या दिवशी माझा एक मित्र म्हणतो तुझाशी कसं बोलणार तुझ्याकडे तर व्हाट्स अपच नाहिये. मी फक्त अशाच लोकांशी बोलतो ज्यांच्याकडे व्हाट्स अप, वी-चाट, लाईन आहे. मग त्याचावरून आमच्यात बराच वाद झाला. शेवटी वाद कोणाच्यातही असला तरी नेहमी मुलीच जिंकतात. आता तो स्वतःच मेसेज करतो, फोनही करतो कधीतरी. सांगायचा मुद्दा हा कि सध्या 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात, भेटून बोलायला कोणालाच वेळ नसतो. भेटलं तरी पूर्वीसारखं बोलणं होत नाहि. घरचे पण हेच बोलत असतात, काय आजकालची मुलं, नुसता त्या डबड्याला (मोबाईल) चिकटलेली असतात.

        त्या दिवशीच्या रात्री असंच विचार करत बसले तेव्हा लक्षात आलं कि, एवढा वेळ सोबत होतो पण कुणी कोणता ड्रेस घातला होता, कुणी काय खाल्लं याकडे कोणाचं लक्षहि नव्हता. फक्त समोरासमोर असूनही व्हर्चुअली एकत्र होतो. सध्या भेटणं होतं ते फक्त मोबाईलचं! दिवसातून फक्त एकदाच नाही तर प्रत्येक क्षणाला, त्यामुळे तो थोडाजरी नजरेआड गेला तरी करमत नाही. मग तो जवळ असल्याचे भास व्हायला लागतात.

        मोबाईल जवळ नसला कि शोधायचा, रिंग वाजत नसली तरी ती वाजतेय असे वाटलं, मेसेज आला नसला तरी मेसेज ची रिंग ऐकू यायला लागली कि समजायचा कि 'नोमोफोबिया' झालाय. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल जवळ नसणे.  असं थोडंजरी तुमचा सोबत होत असेल तर जास्त घाबरायचा नाही. फक्त थोडसं मोबाइलला दूर ठेवायचं. जास्त मेसेज मेसेज खेळत नाही बसायचं. तसं हे थोडंसं नाही पण बरंचस कठीण आहे माहितेय मला. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली कि त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली, ती जास्त प्रमाणात केली कि त्याचं व्यसन लागतं… आणि व्यसन लागलं कि ते लवकर सोड म्हटलं तरी सुटत नाही … सध्या प्रत्येकालाच हे व्यसन लागलंय.

हा आवाज ??? अरे किती वेळ झालाय ……  माझा फोन वाजतोय यार ……. ! :P

Tuesday, 2 July 2013

नेहमी मीच का ???


   'मी तिच्यावर एवढं प्रेम केलं तरी ती मला का नाही मिळाली...' नेहमी माझा बाबतीतंच असं का होतं? नेहमी मीच का? 'मी एवढा अभ्यास केला तरी एटीकेटी लागलीच, तिनी जास्त अभ्यास न करता, तिला फस्ट क्लास मिळाला...' माझासोबतच हे व्हायचं होतं का?... आपल्या कानावर पडणारी ही नित्याची वाक्ये ... काही झालं तरी नेहमी मीच का म्हणून? अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का?

  कधी निवांत क्षणी असा विचार केला ना कि लक्षात येतं कि, हा पडणारा प्रश्न नेहमी ताण-तणाव, विनोदी प्रसंग, लाज आणणार्या गोष्टी झाल्यावरच पडतो. जसे कि, ऑफिसमध्ये सगळ्यात चांगलं काम केलेलं असलं तरी, प्रोमोशन दुसरंच कोणाला तरी मिळणार. सुट्टीचा दिवस गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत घालवायचा असेल तर नेमकं त्याच वेळी आईला घरच्या साफ-सफाई साठी तुम्ही हवे असता(इतर भाऊ-बहिण असतानादेखील) किंवा नेमकं तुमच्या खास मित्रांना तुम्हाला भेटायचं असतं. अशावेळी वाटतं हे माझासोबतच व्हायचं होतं. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्य बाबतीत देखील हेच, मी का म्हणून नेहमी लवकर यायचं आणि समोरच्याची वाट बघायची? दारुडे नवरे-सासुचा छळ सहन करण्यार्या सुना पण हेच म्हणतात. मीच का हा छळ सहन करायचा? भ्रष्टाचार करणारी नेतेमंडळी पकडले गेल्यानंतर देखील हेच म्हणत असणार, देशात इतर लोकसुध्दा भ्रष्टाचार करतात पण यांना पकडायला मीच बरा सापडलो? असे कितीतरी प्रसंग सांगता येतील जेव्हा आपल्या मेंदूत 'नेहमी मीच का? हा प्रश्न वळवळायला लागतो.

   कधी चांगली घटना घडल्यानंतर हा विचार केला का कि देवा हि चांगली घटना माझ्यासोबतच घडायची होती का? अनपेक्षित पणे निकाल चांगला लागला, अचानक लॉटरीचे तिकिट लागले, नोकरीत बढती मिळाली, आपल्याला आवडणारी मुलगी/मुलगा आपल्याशी आपण होऊन बोलायला आला, ऑफिस/कॉलेजला जाताना एकही सिग्नल लागला नाही अशावेळी आपण म्हणतो का, 'मीच का?' चांगलं झालं की कुणी त्याच्या नावाने ओरडत नाही पण वाईट काही झाले की नशीब आणि इतर सर्वांना त्यात सहभागी केलं जातं.

    हे जीवन सुंदर आहे, नेहमी नकारात्मक विचार करुन काहिच साध्य होत नाही. सकाळी लवकर मीच का उठावं हा प्रश्न डोक्यात आला कि विचार करा, काहि लोकांना तर दुसर्या दिवशीचा सूर्य देखील पाहता येत नाहि, झोपेतच ते जगाचा निरोप घेतात. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडची वाट पाहण्यात कसला आलाय मीपणा! विचार करा काहींना तर आपली आवडती व्यक्ती पण पटवता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला तर त्यांचा विचार करा ज्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील भीक मागावी लागते. सिग्नल लागला तर लागु दे कि तुझ्या भल्यासाठीच तर आहे ना तो! वृध्द आई-वडिलांना मीच का म्हणून सांभाळायचं, विचार करा त्या लोकांचा ज्यांनी कधीच आपल्या आई-वडिलांचे तोंड देखील पाहिले नाहि. एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला किंवा यासाठी मीच का हा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नक्की त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जी त्या गोष्टीपासून वंचित आहे, मग त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे 'Dont say WHY ME, say TRY ME.' हे जीवन जगण्यासाठी आहे. वर्तमानरुपी 'PRESENT' आहे, त्याचा हसतहसत स्वीकार करा. 

***






Lingya Ghat Waterfall Trek : 'लिंग्या' सुळक्याचा दिमाख अन् कोसळणारा धबधबा; धामणओहोळ परिसरात निसर्गप्रेमींची गर्दी!

सह्याद्रीच्या कुशीतील छुपे सौंदर्य: लवासाजवळील ' लिंग्या घाट धबधबा ट्रेक ' ठरतोय ट्रेकर्सची पहिली पसंती! सह्याद्रीच्या कुशीत दडलेल...