'मी तिच्यावर एवढं प्रेम केलं तरी ती मला का नाही मिळाली...' नेहमी माझा बाबतीतंच असं का होतं? नेहमी मीच का? 'मी एवढा अभ्यास केला तरी एटीकेटी लागलीच, तिनी जास्त अभ्यास न करता, तिला फस्ट क्लास मिळाला...' माझासोबतच हे व्हायचं होतं का?... आपल्या कानावर पडणारी ही नित्याची वाक्ये ... काही झालं तरी नेहमी मीच का म्हणून? अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का?
कधी निवांत क्षणी असा विचार केला ना कि लक्षात येतं कि, हा पडणारा प्रश्न नेहमी ताण-तणाव, विनोदी प्रसंग, लाज आणणार्या गोष्टी झाल्यावरच पडतो. जसे कि, ऑफिसमध्ये सगळ्यात चांगलं काम केलेलं असलं तरी, प्रोमोशन दुसरंच कोणाला तरी मिळणार. सुट्टीचा दिवस गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत घालवायचा असेल तर नेमकं त्याच वेळी आईला घरच्या साफ-सफाई साठी तुम्ही हवे असता(इतर भाऊ-बहिण असतानादेखील) किंवा नेमकं तुमच्या खास मित्रांना तुम्हाला भेटायचं असतं. अशावेळी वाटतं हे माझासोबतच व्हायचं होतं. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्य बाबतीत देखील हेच, मी का म्हणून नेहमी लवकर यायचं आणि समोरच्याची वाट बघायची? दारुडे नवरे-सासुचा छळ सहन करण्यार्या सुना पण हेच म्हणतात. मीच का हा छळ सहन करायचा? भ्रष्टाचार करणारी नेतेमंडळी पकडले गेल्यानंतर देखील हेच म्हणत असणार, देशात इतर लोकसुध्दा भ्रष्टाचार करतात पण यांना पकडायला मीच बरा सापडलो? असे कितीतरी प्रसंग सांगता येतील जेव्हा आपल्या मेंदूत 'नेहमी मीच का? हा प्रश्न वळवळायला लागतो.
कधी चांगली घटना घडल्यानंतर हा विचार केला का कि देवा हि चांगली घटना माझ्यासोबतच घडायची होती का? अनपेक्षित पणे निकाल चांगला लागला, अचानक लॉटरीचे तिकिट लागले, नोकरीत बढती मिळाली, आपल्याला आवडणारी मुलगी/मुलगा आपल्याशी आपण होऊन बोलायला आला, ऑफिस/कॉलेजला जाताना एकही सिग्नल लागला नाही अशावेळी आपण म्हणतो का, 'मीच का?' चांगलं झालं की कुणी त्याच्या नावाने ओरडत नाही पण वाईट काही झाले की नशीब आणि इतर सर्वांना त्यात सहभागी केलं जातं.
हे जीवन सुंदर आहे, नेहमी नकारात्मक विचार करुन काहिच साध्य होत नाही. सकाळी लवकर मीच का उठावं हा प्रश्न डोक्यात आला कि विचार करा, काहि लोकांना तर दुसर्या दिवशीचा सूर्य देखील पाहता येत नाहि, झोपेतच ते जगाचा निरोप घेतात. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडची वाट पाहण्यात कसला आलाय मीपणा! विचार करा काहींना तर आपली आवडती व्यक्ती पण पटवता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला तर त्यांचा विचार करा ज्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील भीक मागावी लागते. सिग्नल लागला तर लागु दे कि तुझ्या भल्यासाठीच तर आहे ना तो! वृध्द आई-वडिलांना मीच का म्हणून सांभाळायचं, विचार करा त्या लोकांचा ज्यांनी कधीच आपल्या आई-वडिलांचे तोंड देखील पाहिले नाहि. एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला किंवा यासाठी मीच का हा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नक्की त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जी त्या गोष्टीपासून वंचित आहे, मग त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे 'Dont say WHY ME, say TRY ME.' हे जीवन जगण्यासाठी आहे. वर्तमानरुपी 'PRESENT' आहे, त्याचा हसतहसत स्वीकार करा.
***