जर तुम्ही साचेबद्ध फिल्मी पोलिस ड्रामा समजून या सिरीयलकडे पाठ फिरवणार असाल, तर ती तुमची मोठी चूक ठरेल. 'आरण्यक' ही हिंदी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मोजक्या आणि सर्वोत्कृष्ट क्राईम थ्रिलर वेब सिरीयलपैकी एक आहे. पहिल्या पाच मिनिटांत प्रेक्षकांचा ताबा घेणारी ही वेब सिरिज ८ भाग संपेपर्यंत तुम्हाला स्क्रीनवरून हलू देत नाही!
या कथेची पार्श्वभूमी आहे हिमाचल प्रदेशातील 'सिरोना' नावाचे
एक छोटे, थंडी
आणि धुक्यात गुरफटलेले गाव. वरवर शांत दिसणाऱ्या या गावात एक भयानक भूतकाळ दडलेला
आहे. तब्बल १९ वर्षांपूर्वी याच गावात ९ तरुणींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता आणि त्यांचे
मृतदेह जंगलात झाडावर लटकावले होते. गावात अशी अफवा असते की, हे कृत्य एका 'अर्धमानव-बिबट्या' (नर-तेंदुआ) सारख्या हिंस्त्र प्राण्याने केले आहे. अर्थात, अशा अंधश्रद्धांवर पोलिसांचा विश्वास नसतो आणि हे
प्रकरण फाईलबंद होते. कथेला मुख्य कलाटणी तेव्हा मिळते, जेव्हा गावात आलेल्या एका फ्रेंच टुरिस्ट बाईची
मुलगी अचानक बेपत्ता होते आणि १९ वर्षांपूर्वीच्या त्याच भयानक घटनांची पुनरावृत्ती सुरू होते!
पोस्टरवर रविनाला पोलिसी गणवेशात पाहून ही एक नेहमीची फिल्मी सिरीयल वाटू शकते, पण तिचा अभिनय हा भ्रम तोडून
टाकतो. एकाच वेळी आपली कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्य निभावणारी, स्थानिक भाषा-लहेजा पकडलेली इन्स्पेक्टर कस्तुरी डोग्रा ही 'लातों
के भूत बातों से नहीं मानते' अशा करड्या मनोवृत्तीची आहे.
आपल्या मुलीच्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी ती एक वर्षाच्या प्रदीर्घ रजेवर जायच्या
तयारीत असते. रजेवर असूनही कस्तुरीला घरी स्वस्थ बसवत नाही आणि ती हळूहळू या
तपासात ओढली जाते. जसा तपास पुढे सरकतो, तशी तक्रार करणाऱ्या फ्रेंच आईपासूनच एक-एक धक्कादायक
रहस्ये समोर येऊ लागतात.
कस्तुरीच्या बदली नवीन आलेला इन्स्पेक्टर परमब्रत चॅटर्जी (अंगद मलिक) हा
अत्यंत संयत आणि शिस्तप्रिय आहे. त्याच्या चार्ज घेण्याच्या पहिल्याच दिवशी फ्रेंच
मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार येते. 'कहाणी' सिनेमापासून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या परमब्रतने इथेही तितकाच संयत आणि प्रभावी अभिनय केला आहे. रविना
आणि त्याची जोडी सिरीयलचा मुख्य कणा आहे. आशुतोष राणा, झाकीर हुसैन आणि इंद्रनील
सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांनी कथेला एक वेगळी उंची दिली आहे. अनुभवी
कलाकारांसोबतच नवीन चेहऱ्यांनीही अतिशय वास्तवदर्शी काम केले आहे, ज्यामुळे कुठेही कृत्रिमता जाणवत
नाही.
दिग्दर्शक विनय वैकुल यांनी कथेची पकड एकाही फ्रेमवरून ढिली होऊ दिली नाही. गाव छोटे असल्याने सर्वच जण एकमेकांना ओळखत असतात. दिग्दर्शकाने कथेमध्ये अनेक विविध पैलू आणि व्यक्तिरेखा इतक्या अप्रतिम पद्धतीने विणल्या आहेत की प्रेक्षक प्रत्येक एपिसोडगणिक चक्रावून जातो. गावातील लोकांचे एकमेकांशी असलेले अंतर्गत आणि संशयास्पद संबंध कथेला अधिक गूढ बनवतात. नवीन आलेल्या इन्स्पेक्टर अंगदच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या मुलासोबत घडलेली एक अशीच जुनी घटना त्याला आतून पोखरत असते. कस्तुरीचे तिच्या पतीसोबत असणारे मतभेद आणि तिचे निवृत्त पोलीस हवालदार असलेले सासू-सासरे (विशेषतः काहीसे संभ्रमावस्थेत वाटणारे सासरे - आशुतोष राणा) कथेला एक वेगळा कौटुंबिक आणि भावनिक कोन देतात. गावातील दोन स्थानिक राजकीय पुढाऱ्यांची एकमेकांवर मात करण्याची धडपड तपासात सतत अडथळे आणत राहते. जंगलात फिरणाऱ्या त्या कथित 'अर्धमानव-बिबट्या' (नर-तेंदुआ) दहशत आणि रहस्य कथेचा सस्पेन्स शेवटपर्यंत ताणून धरते. या सगळ्या गुंतवळ्यात नेमका खुनी 'हा की तो, की तिसराच?' अशा गटांगळ्या प्रेक्षक प्रत्येक एपिसोडगणिक खात राहतो. दिग्दर्शक आपल्याला अगदी सातव्या-आठव्या एपिसोडपर्यंत पुढे काय घडेल याचा अंदाज येऊ देत नाही.
वेब सिरिज ची सिनेमॅटोग्राफी खूप सुंदर आणि गूढ आहे. डोंगराळ भागातील धुके, घनदाट जंगल आणि तिथले वातावरण
कॅमेऱ्यात अप्रतिम टिपले आहे. एक भाग संपला की पुढच्या भागात काय होणार, ही उत्सुकता खिळवून ठेवते. आठही भाग सलग पाहावेसे
वाटतात. काही ठिकाणी कथेचा वेग थोडा संथ वाटू शकतो, परंतु रहस्याचा उलगडा करण्यासाठी
तो आवश्यक वाटतो.
'आरण्यक' ही केवळ एक पोलिस केस सोडवण्याची कथा नाही, तर ती मानवी स्वभाव, गुपित आणि जंगलाच्या गूढतेचा एक उत्तम मिलाफ आहे. रमेश सिप्पी आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या दर्जेदार निर्मितीमूल्यांचा स्पर्श या वेब सिरिज ला लाभला आहे. तुम्हाला जर सस्पेन्स, क्राईम आणि थ्रिलर पाहायला आवडत असेल, तर वीकेंडला 'बिंज वॉच' करण्यासाठी ही एक परफेक्ट सिरीयल आहे! अवश्य पाहा.
प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स (Netflix)
निर्मिती: रमेश सिप्पी आणि सिद्धार्थ रॉय कपूर
दिग्दर्शन: विनय वायकुळ
कलाकार: रविना टंडन, परमब्रत
चॅटर्जी, आशुतोष
राणा, झाकीर
हुसैन, इंद्रनील
सेनगुप्ता आणि इतर.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा