गुरुवार, १४ नोव्हेंबर, २०१३

Sports Reality .. खोला बॉक्स… निकला सामोसा …





काही दिवसांपूर्वी एका क्रीडा पुरस्काराला जाण्याचा योग आला. हा कार्यक्रम शहरापासून जरा दुर होता. पुरस्कारार्थी सगळे पंधरा वर्षाच्या आतील म्हणजे पहिली ते नववी पर्यंतचे मुल-मुली त्यात होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी बारा वाजताची होती. आपल्याकडे लग्नाला जायच म्हटलं कि लोक थोड उशिरा जातात, कारण असतं कि भारतात लग्न कधी वेळेवर सुरु होत नाहीत. परंतु, शाळेत भेट द्यायला कुणी 'मोठा व्यक्ती' येणार असेल तर मुलांना किमान एक-दोन तास तरी वेळेच्या आधी बोलावून घेतात. या कार्यक्रमाचं देखील असंच झालं. कुणी मंत्री संत्री येणार होते ज्यांचा हस्ते मुलांना पुरस्कार दिले जाणार होते. बारा वाजताच्या कार्यक्रमाला या मुलांना दहा वाजताच आणून बसवलं  होतं. 



क्रीडा विश्वात खेळाडू काय काय कामगिरी करतात हे सामान्य लोकांना कधीच कळत नाही. बिग बॉस मध्ये एक गेम अशी होती कि त्यामध्ये घरातील सदस्यांना स्वतःच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीवरून स्वतःला पॉईण्ट्स द्यायचे होते. यामध्ये संग्राम सिंग हा खेळाडू असून त्याने काय कामगिरी केली हे घरातील सदस्यांना काय दर्शकांना देखील माहित नव्हते पण जेव्हा सलमान खानने शनिवारचा भागात त्याची कामगिरी सांगितली तेव्हा सर्वचजन थक्क झाले. भारतात फक्त काही ठराविक खेळाडूच सामान्य लोकांच्या ओळखीचे आहेत उदा. सचिन, धोनी, विराट  म्हणजेच जे क्रिकेट मध्ये आहेत फक्त तेच … बाकी खेळाडू कोणाच्या खिजगणतीत देखील नाही. 

माझी एक मैत्रीण अथलेटीक्स मध्ये होती,  ती सांगायची तिचा प्रक्टिससाठी होणारा खर्च आणि तिला मिळणाऱ्या  पुरस्काराची रक्कम म्हणजे "चार आण्याची कोंबडी आणि रुपयाचा मसाला" अशी तर्हा होती. आजच्या कार्यक्रमात देखील असच काहीसं झालं होतं एक वाजत आला होता तरी कार्यक्रम सुरु झाला नव्हता. सकाळी दहा वाजता येउन बसलेली मुलं दुपारी एक वाजेपर्यंत भुकेनं तळमळत बसली हो. शेवटी मंत्रीमहोदय तर आलेच नाही पण जे कोणी प्रमुख? पाहुणे आले होते त्यांच्या उपस्थितीत  कार्यक्रम सव्वाला सुरु झाला. मुलांचे त्या कार्यक्रमात लक्ष पण नव्हते त्यांचं लक्ष होतं इथून बाहेर कसं पडता येईल आणि काहीतरी कसं खाता येईल. कसाबसा तो कार्यक्रम  दिमाखात? पार पडला. गेटजवळ मिठाईचे बॉक्स वाटप सुरु होतं. सगळी मुलं तिकडे तुटून पडली. आम्ही तिथेच बसलेलो होतो. एका साईडला  मिठाई वाटप आणि दुसऱ्या  बाजूला बुफेची मांडणी चालली होती. मुलांना एकेक बॉक्स देऊन त्यांची रवानगी केली.  इतका वेळ आम्हाला वाटलं कि बुफे या मुलांसाठीच आहे परंतु तो फक्त मंत्री आणि इतर पाहुण्यांसाठी होता. तो  बॉक्स मिळवण्यासाठी मुलं भांडत बसली होती. वाटप करणारा मधेच मुलांवर ओरडत होता, त्यांना ढकलत होता.  एकदाचे ते  मिठाई वाटप संपले. काही मुलं उशिरा आली त्यांना पकडून आणून त्या वाटप करणार्याने बॉक्स त्यांच्या हातात दिले आणि म्हणाला "खा रे!! खेळाडूंनी खायचं असतं दणकून(मला तिथे जाऊन त्याला दोन दणकून द्याव्यास्या वाटल्या, पण त्यात त्याचा काही दोष नव्हता)!! खा रे! ! खा! !" एवढेसे खाल्यावर कसं परफॉर्म करणार?  प्रत्येकाला उत्सुकता होती या रंगबिरंगी बॉक्स  मध्ये काय असेल?? सभागृहाच्या बाहेरच्या कट्ट्यावर मुले बॉक्स खोलून खात बसली होती. त्यात काय होते तर दोन सामोसे, एक लाडू, एक फ्रुटी? सकाळपासून उपाशी असलेल्या मुलांसाठी(भावी खेळाडूंसाठी) फक्त एक  मिठाईचा बॉक्स? दुसर्याच बाजूला काही पाहुणे होते ज्यांना काही खाण्याची देखील इच्छा नव्हती तरी त्यांना जबरदस्तीने बॉक्स दिले जात होते आणि वरती जेवणाचे आमंत्रण देखील दिले जात होते. 

आपल्या देशात ज्याला खरंच अन्नाची गरज आहे त्यांना काही दिले जात नाही आणि जे खाऊन-पिऊन सुखी असतात त्यांनाच खाण्याचा आग्रह केला जातो. इतर देशात खेळाडूना चांगले खाणे आणि प्रशिक्षणहि दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे पदकांची संख्या वाढतच जाते.  ती मुले त्या एका बॉक्स वर खुश झाली, पण खेळाडूंना असंच खाणं मिळत राहिलं तर तुम्ही त्यांचाकडून पदकं मिळवण्याची अपेक्षा कशी करू शकता ???

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

No-Mobile-Phone Phobia




काल रविवार असल्याने आमच्या सगळ्या कंपू ला सुट्टी होती त्यामुळे भेटायचं ठरलं. खूप दिवसांनी भेटलं कि बरंच काही बोलायचं असतं. मुलांचं माहित नाही पण मुलींना खूप दिवसांनी असो किंवा दिवसातून खूप वेळा असो बोलायचा कधीच कंटाळा येत नाही. शॉपिंग, ज्वेलरी, बॉयफ्रेंड, सिनेमा… वगैरे वगैरे …  अशा नानाविध विषयांवर गप्पा चालू असतात. खुप दिवसांनी भेटणार असलो कि मैत्रीनींमध्ये मिरवायला (किंवा जेलस करायला) नविनातला नवीन ड्रेस, किंवा नुकतंच खरेदी केलेल्या गोष्टी घालायच्या असतात. आम्ही भेटलो 'हाय' 'हेलो' झालं, काय खायचं ते मागवलं. पण गप्पा मारायला भेटलेलो आम्ही आपापल्या मोबाईल मध्ये मग्न झालो.  वालपेपर, गाणी एकमेकांना 'सेंड' करत बसलो. कोणी काय ड्रेस घातलाय किंवा कोणी कुठली ज्वेलरी घातली याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. सगळे फेसबुकवर फोटो अपलोड करण्यासाठी फोटो काढत बसले होते.….  काही एकमेकींचे….  काही मागवलेल्या खाण्याचे.… 



पूर्वी भेटलं कि कित्तेक विषयावर गप्पा व्हायच्या. आता प्रत्यक्ष भेटून गप्पा न होता 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात. सतत व्हाट्स अप चालू असतं. त्या दिवशी माझा एक मित्र म्हणतो तुझाशी कसं बोलणार तुझ्याकडे तर व्हाट्स अपच नाहिये. मी फक्त अशाच लोकांशी बोलतो ज्यांच्याकडे व्हाट्स अप, वी-चाट, लाईन आहे. मग त्याचावरून आमच्यात बराच वाद झाला. शेवटी वाद कोणाच्यातही असला तरी नेहमी मुलीच जिंकतात. आता तो स्वतःच मेसेज करतो, फोनही करतो कधीतरी. सांगायचा मुद्दा हा कि सध्या 'व्हर्चुअली' जास्त गप्पा होतात, भेटून बोलायला कोणालाच वेळ नसतो. भेटलं तरी पूर्वीसारखं बोलणं होत नाहि. घरचे पण हेच बोलत असतात, काय आजकालची मुलं, नुसता त्या डबड्याला (मोबाईल) चिकटलेली असतात.

त्या दिवशीच्या रात्री असंच विचार करत बसले तेव्हा लक्षात आलं कि, एवढा वेळ सोबत होतो पण कुणी कोणता ड्रेस घातला होता, कुणी काय खाल्लं याकडे कोणाचं लक्षहि नव्हता. फक्त समोरासमोर असूनही व्हर्चुअली एकत्र होतो. सध्या भेटणं होतं ते फक्त मोबाईलचं! दिवसातून फक्त एकदाच नाही तर प्रत्येक क्षणाला, त्यामुळे तो थोडाजरी नजरेआड गेला तरी करमत नाही. मग तो जवळ असल्याचे भास व्हायला लागतात.


मोबाईल जवळ नसला कि शोधायचा, रिंग वाजत नसली तरी ती वाजतेय असे वाटलं, मेसेज आला नसला तरी मेसेज ची रिंग ऐकू यायला लागली कि समजायचा कि 'नोमोफोबिया' झालाय. नोमोफोबिया म्हणजे मोबाईल जवळ नसणे.  असं थोडंजरी तुमचा सोबत होत असेल तर जास्त घाबरायचा नाही. फक्त थोडसं मोबाइलला दूर ठेवायचं. जास्त मेसेज मेसेज खेळत नाही बसायचं. तसं हे थोडंसं नाही पण बरंचस कठीण आहे माहितेय मला. एखादी गोष्ट सलग २१ दिवस केली कि त्याची सवय लागते आणि एकदा सवय लागली, ती जास्त प्रमाणात केली कि त्याचं व्यसन लागतं… आणि व्यसन लागलं कि ते लवकर सोड म्हटलं तरी सुटत नाही … सध्या प्रत्येकालाच हे व्यसन लागलंय.

हा आवाज ??? अरे किती वेळ झालाय ……  माझा फोन वाजतोय यार ……. ! :P

गुरुवार, ११ जुलै, २०१३

गड आला पण सिंह गेला .. रिमझिम पाऊस, गरमागरम पिठलं-भाकरी आणि सिंहगडचा निसर्ग!

पुण्यातील गडप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी पावसाळा सुरू झाला की पहिली पसंती असते ती म्हणजे सिंहगड किल्ला. पुण्याच्या अगदी दक्षिणेला अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर वसलेला हा ऐतिहासिक किल्ला पावसाळ्यात एखाद्या स्वर्गासारखा सुंदर दिसतो. जर तुम्हाला विकेंडला खूप जास्त प्रवास न करता, निसर्गाचा आनंद घेत एक थरारक अनुभव घ्यायचा असेल, तर सिंहगडचा मान्सून ट्रेक हा सर्वोत्तम पर्याय आहे.



किल्ल्याचा गौरवशाली इतिहास माहिती आहे का ? सिंहगडचे मूळ नाव 'कोंढाणा' असे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण या किल्ल्याच्या सावलीत गेले. कोंढाणा किल्ल्याचा इतिहास म्हटला की, वीर तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांच्या पराक्रमाची गाथा डोळ्यांसमोर उभी राहते. "गड आला पण सिंह गेला" हे शिवरायांचे उद्गार याच किल्ल्यासाठी होते. तानाजींच्या अतुलनीय शौर्यामुळेच या किल्ल्याचे नाव बदलून 'सिंहगड' ठेवण्यात आले. त्यामुळे हा ट्रेक केवळ एक निसर्गभ्रमंती नसून महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची अनुभूती देणारी एक सफर आहे.
हा ट्रेक शनिवार वाड्यापासून अंदाजे ३० किमी अंतरावर आहे. या ट्रेकची काठिण्य पातळी सोपी ते मध्यम आहे. ट्रेकचे एकूण अंतर पाहता, पायथ्यापासून म्हणजेच आटकरवाडीपासून गडावर जाण्यासाठी साधारण २.५ ते ३ किलोमीटर चालावे लागते. या प्रवासात गडावर चढण्यासाठी १.५ ते २ तास आणि गड उतरण्यासाठी १ ते १.५ तास इतका वेळ लागतो


प्रवास कसा करावा? (How to Reach)
पुण्यावरून स्वारगेट किंवा कात्रजवरून सिंहगड पायथ्यासाठी (धायरी, खडकवासला मार्गे) पीएमपीएमएल (PMPML) बस सेवा उपलब्ध आहे. जर तुम्ही स्वतःच्या वाहनाने जात असाल, तर 'डोणजे' गावावरून डावीकडे वळून तुम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या आटकरवाडी (Atkarwadi) गावात पोहोचू शकता. येथूनच मुख्य ट्रेकिंगची वाट सुरू होते. ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांच्यासाठी वरपर्यंत जाण्यासाठी पक्का घाट रस्ताही उपलब्ध आहे, जिथे ई-बस (E-Bus) किंवा खाजगी वाहनाने जाता येते. मात्र, पावसाळ्यात ट्रेकिंगचा खरा आनंद पायी चालण्यातच आहे.
पावसाळी ट्रेकचा थरारक अनुभव (The Trail Experience)
पावसाळ्यात सिंहगडचा परिसर हिरव्यागार शालूने वेढलेला असतो. खडकवासला धरणाचा परिसर पार करतानाच आजूबाजूचे सौंदर्य मनाला भुरळ पाडते. आटकरवाडीतून सुरू होणारी पायवाट सुरुवातीला काहीशी चढणीची आहे. वाटेत लहान-मोठे पाण्याचे झरे आणि डोंगरउतारावरून वाहणारे छोटे धबधबे पाहायला मिळतात.


पावसाळ्यात गडावर सतत पाऊस आणि सोसाट्याचा वारा असतो. अनेकदा इतके दाट धुके असते की समोरील रस्ताही दिसत नाही. धुक्यातून वाट काढत, निसरड्या खडकांवरून सांभाळत चालण्याचा अनुभव अत्यंत थरारक असतो. गडाच्या अर्ध्या वाटेवर आल्यावर खाली खडकवासला धरणाचे विहंगम दृश्य दिसते. शेवटी ऐतिहासिक 'पुणे दरवाजा' पार करून आपण गडावर प्रवेश करतो. गडावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, देवटाके (गोड पाण्याचे टाके), कल्याण दरवाजा आणि दूरदर्शनचा टॉवर ही मुख्य आकर्षणे आहेत.





गडावरील झुणका-भाकरी आणि गरमागरम भजी- रानमेवा 
सिंहगडचा ट्रेक हा केवळ निसर्गासाठीच नाही, तर तिथल्या जेवणासाठीही प्रसिद्ध आहे. गडावर चढून गेल्यावर मिळणारी चुलीवरची गरमागरम पिठलं-भाकरी (झुणका-भाकरी), सोलकढी, कांदा भजी आणि मातीच्या मडक्यातील थंडगार दही खाणे हा एक वेगळाच आनंद असतो. ट्रेकचा सगळा थकवा या जेवणाने दूर होतो.


पावसाळ्यात पायवाटेवरील दगड अतिशय निसरडे होतात, त्यामुळे चांगल्या ग्रीपचे ट्रेकिंग शूज वापर करा. मुसळधार पावसात कधीकधी घाटात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. सिंहगड हे आपले ऐतिहासिक वैभव आहे, त्यामुळे गडावर प्लास्टिक किंवा कचरा कुठेही टाकू नका. सिंहगडचा मान्सून ट्रेक तुम्हाला ताजेतवाने करतो आणि मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. या पावसाळ्यात आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत सिंहगडला नक्की भेट द्या!
तुम्ही सिंहगडला सकाळी लवकर जायचा विचार करत आहात की विकेंडच्या गर्दीपासून वाचण्यासाठी निवांत वेळेत? 

मंगळवार, २ जुलै, २०१३

नेहमी मीच का ???


   'मी तिच्यावर एवढं प्रेम केलं तरी ती मला का नाही मिळाली...' नेहमी माझा बाबतीतंच असं का होतं? नेहमी मीच का? 'मी एवढा अभ्यास केला तरी एटीकेटी लागलीच, तिनी जास्त अभ्यास न करता, तिला फस्ट क्लास मिळाला...' माझासोबतच हे व्हायचं होतं का?... आपल्या कानावर पडणारी ही नित्याची वाक्ये ... काही झालं तरी नेहमी मीच का म्हणून? अनेकदा आपल्या सगळ्यांना पडणारा हा प्रश्न - मीच का?




  कधी निवांत क्षणी असा विचार केला ना कि लक्षात येतं कि, हा पडणारा प्रश्न नेहमी ताण-तणाव, विनोदी प्रसंग, लाज आणणार्या गोष्टी झाल्यावरच पडतो. जसे कि, ऑफिसमध्ये सगळ्यात चांगलं काम केलेलं असलं तरी, प्रोमोशन दुसरंच कोणाला तरी मिळणार. सुट्टीचा दिवस गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत घालवायचा असेल तर नेमकं त्याच वेळी आईला घरच्या साफ-सफाई साठी तुम्ही हवे असता(इतर भाऊ-बहिण असतानादेखील) किंवा नेमकं तुमच्या खास मित्रांना तुम्हाला भेटायचं असतं. अशावेळी वाटतं हे माझासोबतच व्हायचं होतं. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडच्य बाबतीत देखील हेच, मी का म्हणून नेहमी लवकर यायचं आणि समोरच्याची वाट बघायची? दारुडे नवरे-सासुचा छळ सहन करण्यार्या सुना पण हेच म्हणतात. मीच का हा छळ सहन करायचा? भ्रष्टाचार करणारी नेतेमंडळी पकडले गेल्यानंतर देखील हेच म्हणत असणार, देशात इतर लोकसुध्दा भ्रष्टाचार करतात पण यांना पकडायला मीच बरा सापडलो? असे कितीतरी प्रसंग सांगता येतील जेव्हा आपल्या मेंदूत 'नेहमी मीच का? हा प्रश्न वळवळायला लागतो.

   कधी चांगली घटना घडल्यानंतर हा विचार केला का कि देवा हि चांगली घटना माझ्यासोबतच घडायची होती का? अनपेक्षित पणे निकाल चांगला लागला, अचानक लॉटरीचे तिकिट लागले, नोकरीत बढती मिळाली, आपल्याला आवडणारी मुलगी/मुलगा आपल्याशी आपण होऊन बोलायला आला, ऑफिस/कॉलेजला जाताना एकही सिग्नल लागला नाही अशावेळी आपण म्हणतो का, 'मीच का?' चांगलं झालं की कुणी त्याच्या नावाने ओरडत नाही पण वाईट काही झाले की नशीब आणि इतर सर्वांना त्यात सहभागी केलं जातं.

    हे जीवन सुंदर आहे, नेहमी नकारात्मक विचार करुन काहिच साध्य होत नाही. सकाळी लवकर मीच का उठावं हा प्रश्न डोक्यात आला कि विचार करा, काहि लोकांना तर दुसर्या दिवशीचा सूर्य देखील पाहता येत नाहि, झोपेतच ते जगाचा निरोप घेतात. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडची वाट पाहण्यात कसला आलाय मीपणा! विचार करा काहींना तर आपली आवडती व्यक्ती पण पटवता येत नाही. अभ्यासाचा कंटाळा आला तर त्यांचा विचार करा ज्यांना शिकण्याची इच्छा असूनदेखील भीक मागावी लागते. सिग्नल लागला तर लागु दे कि तुझ्या भल्यासाठीच तर आहे ना तो! वृध्द आई-वडिलांना मीच का म्हणून सांभाळायचं, विचार करा त्या लोकांचा ज्यांनी कधीच आपल्या आई-वडिलांचे तोंड देखील पाहिले नाहि. एखादी गोष्ट करायचा कंटाळा आला किंवा यासाठी मीच का हा प्रश्न जेव्हा पडेल ना तेव्हा नक्की त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा जी त्या गोष्टीपासून वंचित आहे, मग त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळेल. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे 'Dont say WHY ME, say TRY ME.' हे जीवन जगण्यासाठी आहे. वर्तमानरुपी 'PRESENT' आहे, त्याचा हसतहसत स्वीकार करा. 

***






सोमवार, १ जुलै, २०१३

. . . कितना बदल गया इन्सान!!!




भाग-१

   पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा मानल्या जायच्या, याच गरजामध्ये आता मोबइल(स्मार्टफोन्स्), इंटरनेट, बाईक/कार यांचा समावेश होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रस्त्यावर ब्रॅन्डेड, लक्झुरियस बाईक/कार सर्रास दिसतात. या वाहनांमुळे जिकडे तिकडे ट्रॅफिकच ट्रॅफिक होते. ट्रॅफिक कितीही असले तरी काही मनमोहक कार नक्कीच आपले लक्ष वेधून घेतात.  अशा कार फक्त लक्षच वेधुन घेत नाहीत तर एखाद्याचे प्राणही हिरावून घेतात.

   मला लहानपणीपासून मांजर आणि कुत्री (फक्त पिल्लु) खूप आवडतात, त्यादिवशी झालं असं, मी बसस्टॉपवर बसची वाट पहात थांबले होते. एक छोटसं पपी अहो कुत्र्याच पिल्लु हो! अस 'क्युट'सं, काळ कुळकुळीत! ते असं लुटूलुटू रस्ता पार करत होतं. त्याच वेळी समोरुन एक मनमोहक कार येत होती. पपी ची दिरंगाई आणि ड्रायव्हर ची घाई या दोहोंचा मेळ बसला नाही आणि क्षणार्धात पिल्लु चा निष्प्राण देह समोर दिसला. कार तर केव्हाच हवेच्या वेगाने पसार झाली, मागे वळूनही न पाहता...

   अशा वेळी मनात विचार येतो, ते पिल्लु एवढुसं छोटुसं असला म्हणून काय झाल. जर त्या पिल्लु च्या जागेवर एखादा मनुष्य प्राणी असता तर लगेच लोक जमा झाले असते. पोलिस कम्प्लेन्ट केली असती आणि बरच काही.. तो पपी एक छोटासा प्राणी म्हणून त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. 

भाग- २ 

   केदारनाथला गेलेल्या भाविकांची झालेली दशा आणि त्या महाकाय संकटातून सहीसलामत परत आलेल्या नागरिकांचे अनुभव, त्यांच्या प्रतिक्रिया आपण वृत्तपत्रे आणि विविध वाहिन्यांच्या माध्यमातून पाहिल्या. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशाच दोन कुटुंबियांना भेटण्याचा नुकताच् योग आला. एका डोळ्यातून आपल्या माणसांना भेटल्याचा आनंद तर दुसर्य़ा डोळ्यातून त्या कठिण प्रसंगात यमदुत समोर दिसत असताना इथून परत घरी जाऊ की नाही अशी अवस्था, असा दुहेरी मिलाप त्या पती-पत्नीच्या अश्रुंद्वारे दिसून येत होता. त्यांनी सांगीतलेल्या अनुभवामध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे; त्या संकटात ही मंडळी अडकली असताना तेथील नागरिकांनी यांना मदत करण्यऐवजी स्वःतचा फायदा करुन घेत होती. अतिववृष्टी मध्ये पावसापासुन आसरा देण्यासाठी यात्रेकरुंकडून पैसे हिसकावून घेत होती. काही लोक पैसे न दिल्यास त्यांना खाली ढकलून देत होती. भारताची संस्कृती आहे 'अतिथी देवो भवः'! दुसर्या राज्यातून आलेल्या भाविकांचि मदत करण्यऐवजी त्यांनाच लुटले जात होते. कुठे गेली माणसाची माणुसकी? जवानांच्या मदतीने ही मंडळी सहीसलामत घरी आली परंतु बाकी लोकांचे काय? 

अशा वेळी म्हणावसं वाटतं

देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!
सूरज न बदला चांद न बदला ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान कितना बदल गया इन्सान!!


***

रविवार, ३० जून, २०१३

Monsoon Memories


 
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणांत येते सर सर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे ...


शाळेत असताना 'पावसाळा' या विषयावर निबंध लिहिताना मी नेहमी बाल कवींच्या कवितेतील या ओळींनी निबंधाची सुरुवात करायचे. पाऊस ही अशी गोष्ट आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. तो सर्वांनाच हवाहवासा वाटतो. प्रत्येकाची पाऊस 'एन्जॉय' करण्याची पध्द्त वेगवेगळी असली तरी तो आला की सगळेच आनंदुन जातात. पुर्वी लहान मुले पावसात होड्या सोडत बसायचे पण सध्या होड्या कमी दिसायला लागल्या; मुले व्हिडिओ गेमच खेळताना दिसायला लागले. 





पाऊस आला कि कवी-कवयित्री, साहित्यिक, चित्रकार यांच्या विचारांची एक्स्प्रेस धावायला लागते. कोणत्या गोष्टीला कोणत्या 'उपमे'च्या डब्ब्यात टाकतील ते सांगता येत नाही. आपल्या भावना ते शब्दांमधे उतरवण्याचा प्रयत्न करतात; मग ती कविता असो, चित्र असो किंवा एखादा छोटासा लेख. आपल्या विचारांनी निसर्गाचे अनमोल सौन्दर्य त्यांच्याकडून शब्द, लेखणी, कुंचला यांच्याद्वारे कागदावर साकारले जाते. छायाचित्रकार 'युनिक' फोटो शोधत बसतात. ते पावसातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या कॅमेर्यात कैद करतात. भिजणारी लोक, पावसाचा आनंद लुटणारी लहान मुले, एकाच छ्त्रीत फिरणारी प्रेमी युगुले, पावसाच्या मार्याने पडलेली झाडे अशा विविध विषयातून लोकांसमोर पावसाळा मांडतात. 



प्रत्येकाची निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी आणि मांडण्याची पध्दत वेगवेगळी असली तरी सामान्य लोकांना भुरळ पाडणारी नक्कीच असते. हिरवाईचं समृद्ध लेणं ल्यायलेली सृष्टी, आकाशातील इंदधनुष्यामुळे झालेले सप्तरंगी विचार, विविध फुलांनी सजलेली धरणीमाता अशा विविध उपमांच्या आधारे मानवी जीवन आणि निसर्ग यांचा सहसंबंध जोडला जातो. कोणताही कवी निसर्ग नुसताच अनुभवत नाही किंवा त्यातल्या सौंदर्याचा आस्वाद घेत नाही तर तो जीवनाच्या व्यापकतेचा शोध घेत असतो. 


कवी-कवयित्रीच्या भावना शांता शेळके यांच्या या कवितेतून दिसतात.....


झाडांवरी मुके, पाखरांचे थवे, वीज लालनिळी, कशी नाचे लवे, तेजाळते उभ्या अवकाशांत ग.
वीज कडाडतां, भय दाटे उरीं, एकलि मी इथे, सखा राहे दुरी, मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग. 


पावसाळ्याची चाहूल लागली की ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी स्थळे शोधायला सुरुवात करतात. ट्रेकर लोक सिंहगड ते सह्याद्रीच्या सर्व रांगा  तसेच छोटी मोठी जंगले, विविध घाट शोधुन शोधुन फिरत बसतात. पावसाळ्यातला प्रत्येक वीकएन्ड कुठल्या ना कुठल्या तरी गडावर ही मंडळी साजरा करतात. यातच भर पडते ती प्रेमवीरांची; ट्रेकर्स सारखी ही मंडळी देखील ठिकाणे शोधत बसतात. एकाच छ्त्रीखाली फिरत पावसाचा आनंद घेताना दिसतात. पावसात एकत्र आईसक्रीम, एखाद्या गडावर मक्याचे कणीस, खेकडा भजी, सीसीडी मध्ये गरमागरम कॉफी यांचा आस्वाद घेताना दिसतात. हेल्मेट न घालता, स्कार्फ न बांधता, रेनकोट न घालता बाईक ची राईड  म्हणजे अफलातूनच!


ऑफिस सुटल्यावर बाईकवरून घरी जाणारी मंडळी पावसात मुद्दामच अमृततुल्यचा अनुभव घेताना दिसतात; सोबतच असतात गरमागरम भजी, सामोसा, चाट! अशा चहाच्या एका कपाने दिवसभरचे सगळे टेन्शन पळून जाते. नुसत्या नावाने आणि वासानेच खायची -प्यायची इच्छा होते. 


पावसाळ्यात सगळ्यात जास्त भाव खायला लागतात ती मंडळी म्हणजे मजनू-देवदास,  हृदय तुटलेली, 'तनहा दिल' लोक. जी उगीचच आपल्याला खूप दुःख झालय आणि या जगात आपल्याला शायरी करण्यापलिकडे काहिच उरला नाहीये अस वागतात. 


जसे कि माझ्यासारखे लोक ...


ये थन्डि हवा, ये हसीन वादिया, याद कर रहे है तुम्हे|
वो हमारी यादे, मिठी मिठी बाते, और साथ मे बीते हुये खास लम्हे || 


कुणी काही म्हणू, कुणी काही बोलू, पण प्रत्येक जण पाऊस एन्जॉय करतो तोही आपापल्या आगळ्या वेगळ्या रंगात आणि ढन्गात!!!
***


रविवार, १६ जून, २०१३

Break up ...

 


 
 'जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्कील पड जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवाब, 
ना कोई है, ना कोई था, जिंदगी में तुम्हारे सिवा, ओ हमनवाब'.... 

मी हे गाणं ऐकत होते तेवढ्यात 'ती' मला भेटायला आली. पण तेव्हा ती नेहमीप्रमाणे नव्हती. नेहमीप्रमाणे म्हणजे सदा हसतमुख, चॅपॅड चॅपॅड गप्पा मारणारी, नॉन स्टॉप कुठल्याही विषयावर भाषण देणारी, नवीन फिल्म यायच्या आधीच तिच प्रोमोशन करणारी, रोज स्वत:विषयी भरभरून बोलणारी; आज एकदमच शांत शांत होती. मग खूप विचारल्यावर बोलली 'फाइनली आमच चार वेळा ब्रेकअप-पॅचअप झल्यानंतर आता पुन्हा ब्रेकअप झालं आणि हे आता 'दि एण्ड' वाल ब्रेक अप झाल..... इत्यादी'. मला थोड्यावेळ असा वाटलं मी 'जब वी मेट' मधली 'गीत' आहे, जी सगळ्यांच 'सॅड'गीत ऐकत असते आणि 'सोल्यूशन' देत बसते. मी तिला सांगून टाकल 'गेला ना सोडून जाउदेत तू चिल मार ना, कशाला टेन्शन घ्यायचं, मस्त ए जवानी है दिवानी पाहून ये. असा सुतकी चेहरा करून बसलीस ना तर त्याला जास्त आनंद होईल. तू दाखवून दे, मला माझं आयुष्य आहे आणि ते मी आनंदाने जगनारच!....इत्यादी' 


मला हा प्रश्न नेहमी पडतो, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला ती आहे तस स्वीकारलेलं असतं, तर हा 'ब्रेक-अप' नामक कीडा असा कसा या नाजूक नात्यात घुसून त्याला पोकळ करतो. एखाद्या व्यक्तीशी आपण मानसिक, भावनिक, शारीरिक दृष्ट्या एकत्र आलेलो असताना ही 'ब्रेक-अप' ची फॅशन का मधे मधे करते. जन्म झाल्यानंतर आपण आई, वडिल, भाऊ, बहीण ...  विविध नात्यांनी आपोआपच बांधले जातो. रक्ताची नाती म्हणतात त्याला. या नात्यांप्रमाणेच 'त्याच अन् तिच' नातं का होऊ शकत नाही? आई-वडिलांशी, भावा-बहिणीशी भांडण झालं की आपण त्यांचाशी ब्रेक-अप तर नाही ना करत, मग इथेच का ब्रेक-अप करतात ही लोक? रिलेशनशिप  सुरू करताना समोरच्या व्यक्तीच्या सर्वच गोष्टी आवडत असतात(आवडत असल्याचा उगीचच आव आणला जातो). सगळंच सुरुवातीला आलबेल असतं. हळूहळू कळायला लागतं, आपल्याच्याने नाही झेपणार समोरची व्यक्ती आणि मग खटके उडतात. भांडण होतात अन् मग ब्रेक-अप होत. समोरच्या व्यक्तीला ती आहे  तसं स्वीकारलं की असलं ब्रेक-अप वगैरेचा पर्यायच  नाही राहत. 

काल अचानक मला 'ती'ची आठवण आली म्हणून तिला फोन केला. इकडची तिकडची हालहवा विचारून झाल्यावर, तिनेच सांगायला सुरूवात केली. 'ती' आता पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे. आणि आत्ताचा 'तो' तिला "हवा तसा" (अगदी परफेक्ट) आहे. बरीच खुश होती ती. मी फोन ठेवला. म्हटलं चला खुश आहे ना ती(?) मग ठिके! आणि मी कॉफी बनवत बनवत गुणगुणत बसले .....

'दिल संभल जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू, 
दिल यहीं रुक जा ज़रा फिर मोहब्बत करने चला है तू!!! ❤❤❤





तुमचा मेंदू तुम्हाला फसवतोय? जाणून घ्या विचारांचा 'हाजीर तो वजीर' खेळ!

जे सहज आठवतं तेच खरं असतं का? (हा लेख तुमचे विचार बदलून टाकेल!) कधी कधी तुमच्या बाबतीत असे होते का? सकाळी सकाळी एखादी वाईट बातमी पाहता, अनुभ...